कोल्हापूर विमानतळावरील ‘नाइट लॅंडिंग’चे काय झाले?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

दाट धुके आणि ढगाळ वातावरणामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांचे विमान कोल्हापुरात वेळेत उतरवता येत नसल्याचे लक्षात आल्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विमानतळावरील ‘नाइट लॅंडिंग’चे काय झाले? असा सवाल उपस्थित अधिकाऱ्यांसमोर केला.

कोल्हापूर - दाट धुके आणि ढगाळ वातावरणामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांचे विमान कोल्हापुरात वेळेत उतरवता येत नसल्याचे लक्षात आल्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विमानतळावरील ‘नाइट लॅंडिंग’चे काय झाले? असा सवाल उपस्थित अधिकाऱ्यांसमोर केला. नाइट लॅंडिंगची सुविधा असती तर ढगाळ वातावरण आणि दाट धुक्‍यातही विमान उतरवता आले असते. केंद्रीय मंत्र्यांना वेळेत कोल्हापुरात येता आले असते, अशीही चर्चा कार्यकर्त्यांनी केली. मात्र, आचारसंहिता असल्यामुळे श्री. पाटील यांना अधिकृतपणे याची माहिती घेता आली नाही. 

मुंबई, कोल्हापूर, तिरुपती, हैदराबाद विमानसेवा सक्षमपणे सुरू आहे. विमान प्राधिकरणाकडून नाइट लॅंडिंगसाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत. याशिवाय, जिल्हा नियोजन समितीकडूनही दहा लाखांचा निधी दिला आहे. दरम्यान, नाइट लॅंडिंगचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असते. तसेच श्री. शहा यांचे विमानही कोल्हापूरमध्ये वेळेत आले असते. ढगाळ वातावरणामुळे श्री. शहा कोल्हापुरात उतरणार की बेळगावमध्ये याची फोनवरून माहिती घेतली जात होती. 

बेळगावमध्ये गेले तर पुन्हा अर्धा पाऊण तास सभा वेळाने सुरू होणार, लोक सकाळपासून त्यांची वाट पाहत आहेत. अशा वेळेला केवळ नाइट लॅंडिंगची सुविधा नसल्यामुळे दोन तास उशीर होत असेल तर ही सुविधा तत्काळ सुरू केली पाहिजे, असे मत उपस्थित कार्यकर्त्यांनीही व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened to the night Landing at Kolhapur Airport ? The question of Chandrakant Patil