गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे सांगली कनेक्‍शन काय? का सोडावी लागली होती शाळा ! 

अजित झळके
Monday, 28 September 2020

प्रख्यात नाटककार, गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी  दिदींचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबिय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. नाट्यपंढरी सांगलीत दीनानाथांना "मास्टर' ही पदवी बहाल झाली. त्यांची कन्या म्हणजे लतादिदी येथील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलजवळ असलेल्या 11 नंबर शाळेत शिकायला जात. 

सांगली ः गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 91 वा वाढदिवस. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली. पण, महाराष्ट्रातील फार कमी लोकांना लतादिदींच्या सांगली कनेक्‍शन विषयी माहिती आहे. लतादिदींचे बालपण सांगलीत गेले. सध्याच्या एसटी स्टॅंड रोडवरील मॉडर्न बेकरीजवळ मंगेशकर यांचे घर होते. तेथेच त्यांचे बालपण गेले. . 

प्रख्यात नाटककार, गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी दिदींचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबिय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. नाट्यपंढरी सांगलीत दीनानाथांना "मास्टर' ही पदवी बहाल झाली. त्यांची कन्या म्हणजे लतादिदी येथील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलजवळ असलेल्या 11 नंबर शाळेत शिकायला जात. 

याविषयी माहिती सांगताना, सांगलीतील इतिहास अभ्यासक विजय बक्षी म्हणाले, ""त्यावेळी आशाताई लहान होत्या. त्यामुळे लतादिदी आशाताईंना सोबत घेऊन शाळेत जायच्या. एकदा आशाताई रडू लागल्या, त्यामुळे शिक्षकांनी त्यांना खूप रागावले. त्यामुळे लतादिदींची शाळा बंद झाली. त्यांना घरी शिक्षक बोलावून शिकवायला सुरवात केली गेली. पुढे काही काळाने मंगेशकर कुटुंबियांनी सांगली सोडली. मंगेशकर यांचे सांगलीतील वास्तव्य लक्षवेधी होते. त्यांच्या घरात तुपाचे दिवे लावले जायये.'' 

श्री. बक्षी सांगतात, ""लता मंगेशकर यांची हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीवर फार श्रद्धा. त्यामुळे मुंबईहून कधी कोल्हापूरला येणे झाले तर त्या मुद्यामहून सांगलीमार्गे जायच्या. गणपतीचे दर्शन घ्यायच्या.'' 
पुढे सन 2000 साली सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेने मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचे नूतनीकरण केले. त्याचा उद्‌घाटन सोहळा आणि लतादिदींसह मंगेशकर कुटुंबियांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित केला. पंडीत हृदयनाथ मंगेशकर, मीनाताई, उषाताई, आशाताई हे सारे उपस्थित होते.

तत्कालिन महापौर सुरेश पाटील त्या आठवणी सांगताना म्हणाले, ""लतादिदी येथे तीन दिवस राहिल्या. त्यांना सुवर्णाक्षरांनी बनवलेले प्रमाणपत्र बहाल केले होते. तरुण भारत मैदानावर 25 हजार लोकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला होता. जंगी शोभा यात्रा काढली होती. त्या आमच्या घरीच जेवायला होत्या. त्यांना थालीपीठ खूप आवडले होते.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the Sangli connection of Gansamradni Lata Mangeshkar? Why I had to leave school!