रामराजेंच्या 'नो कॉमेंट्‌स' मागे दडलंय काय? 

Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar

सातारा : राष्ट्रवादीचे फलटणचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सध्या मागे पडली आहे. राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी आम्ही राष्ट्रवादीत आणि शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. मात्र, रामराजेंनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवत शिवसेना प्रवेशाबाबत "नो कॉमेंट्‌स' अशी प्रतिक्रिया देत गुगली टाकली आहे. त्यांच्या "नो कॉमेंट्‌स' म्हणण्यामागे नेमके काय रहस्य दडले आहे, असा प्रश्‍न समस्त जिल्हावासीयांना पडला आहे. या प्रश्‍नाचे उत्तर सर्वांना पितृपंधरवड्यानंतरच मिळणार आहे. 

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर रामराजेही भाजपमध्ये जातील, अशी चर्चा सुरू होती. पण, ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलला. त्याच दरम्यान, उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. शेवटी त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता पोटनिवडणुकीला सामोरे जात आहेत. त्याबरोबरच माणचे माजी आमदार जयकुमार गोरे यांचा भाजप प्रवेश झाला. या सर्व घडामोडींत रामराजेंच्या भाजप प्रवेशाला "ब्रेक' लागला. शेवटी त्यांनी फलटण मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असल्याचे लक्षात घेऊन शिवसेनेत जाण्याची तयारी केली. या सर्व हालचाली केवळ चर्चेच्या पातळीवरच राहिल्या आहेत. रामराजेंसोबत त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर हेही पक्ष बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या जाहीर मेळाव्यात शरद पवारांसोबत व्यासपीठावर संजीवराजे निंबाळकर यांची उपस्थिती सर्वांना सुखद धक्का देऊन गेली.

त्यावेळी संजीवराजेंनी आपल्या भाषणात आम्ही राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. पण, सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी याबाबत अद्यापपर्यंत जाहीर भाष्य केलेले नाही. चर्चा काहीही असली तरी राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील किंवा पुणे, मुंबईतील कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय, याबाबतही तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शेवटी ते राष्ट्रवादीसोबतच राहतील, असा अंदाज सर्वांनी बांधला आहे. पण, रामराजेंकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही. शिवसेनेच्या गोटातून मात्र, रामराजे शिवसेनेशी संपर्क ठेऊन असल्याचे सांगितले जात असून, युतीचा निर्णय झाल्यानंतर पितृपंधरवड्यानंतरच त्यांचा प्रवेशाचा निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. 

भूमिका लवकरच स्पष्ट करेन : रामराजे 
यासंदर्भात रामराजे नाईक-निंबाळकर त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी माझी भूमिका लवकरच स्पष्ट करेन, मी निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, असे सांगितले. शिवसेना प्रवेशाचे काय, यावर त्यांनी "नो कॉमेंट्‌स' असेच म्हणत आपला निर्णय पुन्हा गुलदस्त्यात ठेवला आहे. त्यांच्या या "नो कॉमेंट्‌स' मागे नेमके काय रहस्य दडलंय, हे आता पितृपंधरवड्यानंतरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com