कृष्णा कारखान्यासाठी नवी रणनीती काय असेल..

शांताराम पाटील
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

राज्यभर सुरू असलेला महाविकास आघाडीचा प्रयोग कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत राबवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

इस्लामपूर : राज्यभर सुरू असलेला महाविकास आघाडीचा प्रयोग कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत राबवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेस समर्थक कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व राष्ट्रवादी समर्थक माजी अध्यक्ष अविनाश मोहिते या दोघांच्या मनोमिलनावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

या बाबत कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्यासमोर एकत्रित लढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्या प्रस्तावानुसार दोन माजी अध्यक्षांचे मनोमिलन होऊन भाजपच्या अतुल भोसलेंना शह देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपच्या ताब्यात असलेला एकमेव साखर कारखाना म्हणून कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. कऱ्हाड, वाळवा व कडेगाव तालुक्‍यात कार्यक्षेत्र विस्तारलेल्या व सुमारे 48 हजार सभासद संख्या असलेल्या या कारखान्याच्या स्थापनेला सुमारे 60 वर्षे होऊन गेली आहेत. ज्येष्ठ विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते, स्व. जयवंतराव भोसले व स्व. आबासाहेब मोहिते या तिघांच्या प्रयत्नातून या कारखान्याची निर्मिती झाली. निर्मितीनंतर प्रारंभीच्या काळात यशवंतराव मोहिते हे राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याने या कारखान्याचा कारभार त्यांचे बंधू जयवंतराव भोसले यांच्या ताब्यात होता. कालांतराने या दोघाबंधूंच्यात कारखान्याच्या सत्तेवरून उभी फूट पडली. या फुटीनंतर सहकार चळवळीतील कारखान्याचा राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला. कारखान्याच्या सत्तेवरून "सख्खे भाऊ पक्के वैरी' झाले.

या दोघांच्या संघर्षामुळे कारखाना कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांच्यात सुद्धा दुफळी निर्माण होऊन गावोगाव उभी फूट पडली होती. त्यानंतर माजी मंत्री स्व. पंतगराव कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने मोहिते-भोसले गटाचे तथाकथित मनोमिलन झाले. मात्र हे मनोमिलन फार काळ टिकले नाही. काही काळातच या मनोमिलनाला मुडदूस झाला. 2015 च्या कारखाना निवडणुकीत परत एकदा इंद्रजित मोहिते, डॉ. सुरेश भोसले व अविनाश मोहिते या तिघांनी स्वतंत्र पॅनेल टाकून निवडणूक लढवली.

या निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्या 5 जागा विजयी झाल्या. तर 16 जागा भोसले गटाला मिळून कारखान्याची सत्ता डॉ. सुरेश भोसले यांच्या ताब्यात राहिली. भोसले गट भाजपमध्ये, इंद्रजित मोहिते कॉंग्रेस मध्ये तर अविनाश मोहिते राष्ट्रवादीत आहेत. कऱ्हाड दक्षिणच्या निवडणुकीत अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांनी डॉ. सुरेश भोसले यांचे सुपुत्र अतुल भोसले यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठबळ दिले. या निवडणुकीत अतुल भोसले यांचा पराभव झाला. आता कऱ्हाड दक्षिणच्या निवडणुकीनंतर सर्वच भोसले विरोधक राजकीय नेत्यांनी "आता आमचं ठरलय, फक्त कृष्णा कारखाना उरलाय' असा नारा देत कृष्णेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

या निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांनी एकत्रित येऊन भोसलेंना पराभूत करावे असा सूर पृथ्वीराज चव्हाण समर्थक आळवू लागले आहेत. त्या दिशेने पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या बाबतची प्राथमिक बोलणी झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण समर्थक सांगतात. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता तो प्रयोग कॉंग्रेस, राष्ट्रवादी कृष्णा कारखान्यात राबवण्यासाठी आग्रही आहे.

या बाबत अजुन तरी दोन्ही नेत्यांचे फायनल झाले नसले तरी लवकरच डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांची एकत्र चर्चा होऊन मनोमिलन होईल असा दावा दोन्ही बाजूचे समर्थक ठामपणे करू लागले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What will be the new strategies for Krishna sugar factory