कृष्णा-कोयना नदीकाठ तुटल्याने बाप्पांचे विसर्जन कोठे करायचे ? 

हेमंत पवार
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

साकुर्डी नदीकाठच तुटल्याने गणेशमूर्ती विसर्जनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कऱ्हाड  ः महापुराबरोबर कृष्णा-कोयना या मुख्य नद्यांसह अन्य उपनद्यांचे काठही वाहून गेले आहेत. नदीकाठ तुटल्याने तेथे जाणेही मुश्‍कील बनले आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या गणेशोत्सवात त्याची गैरसोय सोसावी लागणार आहे. कऱ्हाड-पाटण तालुक्‍यांतील अनेक गावांतील गणेशमूर्तींचे विसर्जन हे नदीपात्रात होते. मात्र, नद्यांचा काठच तुटून गेल्याने मूर्तींचे विसर्जन कोठे करायचे, हा प्रश्न सध्या संबंधित गावांसमोर आहे. 

काठ तुटलेल्या स्थितीत एखादी दुर्घटना होण्याअगोदरच प्रशासनाने पावले उचलून तेथे आवश्‍यक उपाययोजनांची गरज आहे. कऱ्हाड-पाटण तालुक्‍यांत 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान महापूर आला. त्यामुळे कोयना-कृष्णा नद्यांची पाणीपातळी वाढून अनेक गावांत पाणी घुसले. महापुराच्या पाण्याबरोबर नदीकाठची पिके, जमिनीही वाहून गेल्या. नद्यांचे पात्र तुटून ते नागरी वस्तीकडेही सरकले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरी वस्त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. गणेशोत्सव तोंडावर आला आहे. उत्सवानंतर गणेशमूर्तींचे विसर्जन कऱ्हाड-पाटण तालुक्‍यांतील नदीकाठच्या सर्वच गावांत नदीपात्रात केले जाते. मात्र, बहुतांश गावचा नदीकाठच तुटून गेल्याने यंदा गणेशमूर्ती विसर्जनाचा प्रश्न गावांसमोर उभा आहे. अनेक ठिकाणी नदीकाठावर जाणेही धोक्‍याचे होत आहे. त्यामुळे महापुराने मूर्तींच्या विसर्जनाचाही प्रश्न आहे. त्यासाठी प्रशासनाने संबंधित गावांचा सर्व्हे करून अशा विसर्जनाच्या ठिकाणी आवश्‍यक त्या उपाययोजना राबवण्याची गरज आहे. नदीकाठी वाहने जाण्यासारखी आणि मूर्ती विसर्जन होईल, अशी व्यवस्था न केल्यास एखादी दुर्घटना घडण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. 

प्रामुख्याने रस्त्यांची गरज 

कृष्णा-कोयना नद्यांसह अन्य उपनद्यांच्या पात्रातच दरवर्षी घरगुती आणि मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यंदाच्या महापुराने नदीकाठच वाहून गेला आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी जाणेच धोक्‍याचे बनले आहे. संबंधित ठिकाणी जाण्यासाठी आणि मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी वाहने पात्रापर्यंत जाण्यासाठी प्रामुख्याने तेथे रस्ते करणे गरजेचे आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where to immerse the Ganesh idols raise question due to Krishna-Koyna riverside breakdown ?