ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक, कोविड रुग्णालय मात्र मिरज शहरात

प्रमोद जेरे 
Monday, 21 September 2020

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना कोविड रुग्णालय मात्र मिरज शहरात सुरु करण्याच्या निर्णयाबद्दल आज पंचायत समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचा निषेध झाला.

मिरज  : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना कोविड रुग्णालय मात्र मिरज शहरात सुरु करण्याच्या निर्णयाबद्दल आज पंचायत समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचा निषेध झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोविड रुग्णालये सुरु करण्याचा निर्णयाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी तसेच महापालिकेच्या कत्तलखान्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयाबाबत अभिनंदन करण्यात आले. 

आज झालेल्या या ऑनलाईन सभेत तालुक्‍यातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सदस्यांनी आक्रमकपणे मते मांडली. या ऑनलाईन सभेचे प्रशासनाने अत्यंत ढिसाळ नियोजन केल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सभेत प्रारंभापासूनच तांत्रिक अडचणी येत होत्या. 

पंचायत समितीचा बांधकाम,आरोग्य,आणि अन्य विभागातील भ्रष्टाचाराचे वाभाडे निघाले. अनिल आमटवणे यांनी अध्यक्ष कोरे यांच्यामुळेच ग्रामीण भागावर अन्याय झाल्याचा निषेधाचा ठराव मांडला. किरण बंडगर यांनी अध्यक्षांच्या निषेधाऐवजी त्यांनी उभारलेल्या रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांना प्राधान्य द्यावे असा ठराव घ्या अशी निष्फळ विनंती केली.

मोठ्या जनावरांच्या कत्तलखान्यांसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचे अभिनंदन करण्यात आले. बेडग रस्त्यावरील महापालिकेचा कत्तलखाना बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचेही यावेळी ठरले. 
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी नरवाड आणि एरंडोली पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत घेतलेल्या निर्णयाचीही सदस्यांनी चर्चा घडवून आणली. या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणारे अधिकारी आणि ठेकेदार अद्यापही मोकाट आहेत. गुडेवार यांनी पाणी पुरवठा समितीला नोटिसा पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवल्याचा ही आरोप आमटवणे यांनी केला. 

गंभीरपणे कारवाई करा 
अशोक मोहिते म्हणाले,"" हरिपूर येथील रस्ता दुरुस्तीतील भ्रष्टाचाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग गंभीर नाही. गैरव्यवहार समोर दिसत असतानाही पाठीशी घातले जात आहे. याबाबत गांभीर्याने कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.''

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ...while Kovid Hospital is in Miraj