esakal | चंद्रकांतदादांचा वारसदार कोण ?
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

पुढच्या वर्षी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचा भाजपमधील वारसादार कोण?

चंद्रकांतदादांचा वारसदार कोण ?

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर - पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ते निवडून येतील असा अंदाजही वर्तवला जात आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचा भाजपमधील वारसादार कोण? याची चर्चा कार्यकर्त्यांच्यात जोरात सुरू आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाकडे असल्याने पक्षातील काही इच्छुक यासाठी तयारी करत आहेत. पदवीधरांची नोंदणी करणे, त्यांच्याशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क ठेवणे ही कामे सध्या जोरदार सुरू आहेत. भाजपकडून माणिक पाटील चुयेकर, सचिन पटर्वधन आणि शेखर चरेगावकर ही नावे पदवीधरसाठी चर्चेत आहेत. 

चंद्रकांत पाटील यांना मिळालेले मंत्रीपद, मंत्रिमंडळाच्या उतरंडीमधील त्यांचे द्वितीय स्थान आणि राजकारातील त्यांचा दबाव यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेमध्ये आली. तोपर्यंत ही निवडणूक उमेदवार आणि पक्षाचे काही ठराविक कार्यकर्ते वगळता फारशी चर्चेत नसायची. पुणे पदवीधर मतदार संघ हा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आला. 1990 ते 2002 पर्यंत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे पदवीधरचे आमदार होते. त्यांचा पराभव 2002 साली जनता दल, राष्ट्रवादी आणि डाव्या आघाडीचे उमेदवार शरद पाटील हे निवडून आले. पूर्वी ते मिरज विधानसभा मतदार संघातून आमदार होते. त्यांचा पराभव झाल्याने ते पदवीधर मतदार संघातून उभारले. ते निवडून आले. त्यानंतर चंद्रकांत पाटील 2008 साली निवडणुकीला उभारले. कॉंग्रेसचे माणिक पाटील (चुयेकर), सातारचे राजेश वठारकर, शरद पाटील यांच्यात ही निवडणूक झाली. यामध्ये चंद्रकांतदादांच्या रुपाने भाजपने पुन्हा हा मतदारसंघ काबीज केला. त्यावेळी माणिक पाटील यांनी "यंदा पदवीधर आमदार कोल्हापुरचाच' अशी प्रचाराची संकल्पना मांडली होती. झालेही तसेच पण माणिक पाटील यांच्या ऐवजी चंद्रकांत पाटील विजयी झाले. पण चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने पहिल्यांदाच कोल्हापूरला पदवीधर आमदाराचा मान मिळाला. 
त्यानंतर पुन्हा 2014 साली चंद्रकांत पाटील निवडून आले. त्यावेळी माणिक पाटील यांनी त्यांच्याबरोबर सलोखा करून माघार घेतली.

पुढे माणिक पाटील (चुयेकर) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढच्या वर्षी आहे. चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पदवीधर मतदार संघातून त्यांचा वारसदार कोण होणार याबद्दल भाजपमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

ही नावे आहेत चर्चेत

कोल्हापुरातून माणिक पाटील (चुयेकर) यांनी पुन्हा एकदा पदवीधरच्या रिंगणात भाजपकडून उतरण्याच्या तयारीत आहेत. सहकार भारतीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात सक्रीय असणारे आणि सध्या राज्यमंत्री असणारे कराडचे शेखर चरेगावकर हे देखील पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्‍यता आहे. विधीमंडळाच्या लेखासमीतीचे अध्यक्ष (राज्यमंत्री) पुण्याचे सचिन पटवर्धन यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वच इच्छूकांची तयारी जोरदार सुरू आहे. मिरजेचे मकरंद देशपांडे यांनी विधानसभा निवडणूक महत्वाची भूमिका बजावली असून त्यांचेही नाव पदवीधरसाठी आघाडीवर आहे. 

कोल्हापूर आघाडीवर 
पुणे शहरात भाजपचे आठ आमदार आहेत. सांगलीमध्येही भाजपचे चार आमदार आहेत. कोल्हापुरात मात्र भाजपच्या वाट्याला दोनच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरच्या वाट्याला ही जागा मिळावी, अशी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. नवीन सभागृहात भाजपच्या कोट्यातील बऱ्याच विधानपरिषदेच्या जागा रिक्त होतील. पटवर्धन आणि चरेगावकर यांना या ठिकाणी संधी मिळण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.