पाचशे कोटींचा भुर्दंड बसवण्याच्या महापापातील वाटेकरी कोण ? आज फैसला 

जयसिंग कुंभार
Friday, 21 August 2020

सुमारे पाचशे कोटींचा महापालिकेला भुर्दंड बसवण्याच्या राजकीय महापापातील वाटेकरी कोण ? याचा फैसलाच उद्या (ता. 21) स्थायीच्या बैठकीत होईल. 

सांगली : सुमारे पाचशे कोटींचा महापालिकेला भुर्दंड बसवण्याच्या राजकीय महापापातील वाटेकरी कोण ? याचा फैसलाच उद्या (ता. 21) स्थायीच्या बैठकीत होईल. सदस्य फुटीची शक्‍यता लक्षात घेऊन बहुमतात असलेल्या सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सर्व नऊ सदस्यांसाठी व्हिप जारी केला. घनकचरा प्रकल्पाच्या दोन्ही निविदांना विरोधाचे थेट आदेश दिलेत. प्रारंभापासून प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मात्र तळ्यात मळ्यात सुरु होते. उद्या सकाळी नऊ वाजता बैठक होईल. त्यानंतर निर्णय होईल, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले. 

आयुक्त नितिन कापडणीस यांच्या पुढाकाराने कमालीची गोपनीयता बाळगत संपुर्ण निविदा प्रक्रिया पुढे रेटली जात आहे. दोन्ही निविदा मंजूर झाल्या तर महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून घनकचरा प्रकल्पाची नोंद होईल. जिथे महापालिकेला कचऱ्यापासून उत्पन्नाचा कायमचा स्त्रोत तयार व्हायला हवा तिथेच महापालिका सुमारे शंभर कोटी खर्च करून ठेकेदाराला सुमारे चारशे कोटींची कमाई करून देणार आहे. ठेक्‍यात प्रशासनातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याची भागीदारी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते शेखर माने यांनी केला होता. त्याची प्रचिती हळूहळू येत आहे. याआधी कॉंग्रेस सत्ताकाळातील शेरीनाला-ड्रेनेज योजनेप्रमाणेच भाजप सत्ताकाळातील हा महाघोटाळा ठरेल. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडूनही या घोटाळ्याला रोखले जाईल अशी अपेक्षा आहे.
वाटेकरी कोण ? 
या प्रकरणाला साथ द्यायची की विरोध याची सर्वस्वी जबाबदारी सदस्यांवर असेल. भाजप- सभापती संदिप आवटी, गजानन मगदुम, अजिंक्‍य पाटील, भारती दिगडे, लक्ष्मण नवलाई, राजेंद्र कुंभार, अनारकली कुरणे, गणेश माळी, मोहना ठाणेदार, कॉंग्रेस- अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, प्रकाश मुळके, मनोज सरगर, राष्ट्रवादी-योगेंद्र थोरात, शेडजी मोहिते, मालन हुलवान. 

भाजपच्या सर्व नेत्यांनी विरोधाचा निर्णय घेतला आहे. सर्व सदस्य पालन करतीलल. शहराध्यक्ष दिपक शिंदे यांच्या आदेशानुसार व्हिप दिला आहे. 
- युवराज बावडेकर, गटनेता भाजप 

हरित न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी प्रक्रिया आहे. काही दिशाभूल करीत आहेत. सर्व सदस्यांना पक्षादेश पाळावा. भाजप शहर हितासाठी कटीबध्द आहे.'' 

- मकरंद देशपांडे, सदस्य, भाजप सुकाणू समिती 

ग्रेसची भुमिका विरोधाचीच आहे. प्रकल्पाबद्दल साशंकता आहे. आयुक्तांनी सदस्य व जाणत्यांसमोर खुलासा करावा.'
- उत्तम साखळकर, गटनेते, कॉंग्रेस 

आज दिवसभर चर्चेत होतो. कॉंग्रेससोबत आघाडी असल्याने उद्या चर्चा करून निर्णय करु.'' 
- मैन्नुद्दीन बागवान, गटनेता, राष्ट्रवादी 

भाजप धर्मसंकटात 
सभापती संदिप आवटी यांनी स्थायीच्या अजेंड्यावर विषय घेऊन श्रेष्ठींना उघड आव्हान दिलेय. रात्री उशिरा ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांनी स्थायीच्या सदस्यांची मिरजेत बैठक घेतली. त्यांनी भाजपच्या सदस्यांना निविदेतील "अर्थ' समजून सांगितल्याचे समजते. त्यावर सदस्यांचे पुरेसे समाधान झाले नसल्याचे समजले. उद्या सकाळी ते पुन्हा उर्वरित "अर्थ' समजून सांगणार आहेत. त्यानिमित्ताने भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे विरोधकांचे मनसुबे आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is the culprit behind the Rs 500 crore scam? Decide today