
सांगली महापालिकेतील विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा न झाल्याने त्यांनी महापौर, उपमहापौरपदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केले.
सांगली : महापालिकेतील विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा न झाल्याने त्यांनी महापौर, उपमहापौरपदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केले. कॉंग्रेसकडून विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर यांचा महापौर पदासाठी, तर उमेश पाटील यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गटनेते मैनुद्दीन बागवान आणि दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केले, तर उपमहापौर पदासाठी स्वाती पारधी आणि सविता मोहिते यांनी अर्ज दाखल केले. स्वतंत्र अर्ज दाखल केले तरी दोन्ही पक्षांचे नेते यावेळी एकत्र उपस्थित होते.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी गेले दोन दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनाही महापौर पदासाठी दावा केला होता. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांच्यात काल (बुधवारी) चर्चा होऊन महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार निश्चित करण्याचे ठरले होते. परंतु या दोन्ही नेत्यांचा संपर्क झाला नाही. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते सध्या उपचाराखाली आहेत.
त्यामुळे आजही श्री. पाटील आणि डॉ. विश्वजित कदम त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता कमी असल्याने दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही उपस्थित होते.
निवडणूक संयुक्तपणे लढवणार
भाजपमधील नाराजीचा फायदा मिळण्याचा दावा अर्ज दाखल केल्यानंतर कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधला.
श्री. पाटील म्हणाले, ""राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांच्याशी त्यांची चर्चा झाली नाही. त्यामुळे आमच्या स्तरावर आम्ही स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. 23 तारखेपर्यंत मुदत आहे. तत्पूर्वी दोन्ही नेत्यांची चर्चा होऊन ते जो आदेश देतील त्यानुसार उमेदवार ठेवून निवडणूक लढवू. ही निवडणूक आघाडी संयुक्तपणे लढवणार आहे.''
संपादन : युवराज यादव