‘भोजलिंग’ दुर्घटनेला जबाबदार कोण?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

म्हसवड - जांभुळणी (ता. माण) येथील डोंगरमाथ्यावरील भोजलिंग देवस्थानचे दर्शन घेऊन परतताना उतरणीच्या घाटात भाविकांची जीप खोल दरीत पडून चार महिलांचा मृत्यू झाला. तर बारा महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. पण, या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्‍न आता ऐरणीवर आला आहे. 

म्हसवड - जांभुळणी (ता. माण) येथील डोंगरमाथ्यावरील भोजलिंग देवस्थानचे दर्शन घेऊन परतताना उतरणीच्या घाटात भाविकांची जीप खोल दरीत पडून चार महिलांचा मृत्यू झाला. तर बारा महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. पण, या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्‍न आता ऐरणीवर आला आहे. 

जांभूळणी ग्रामपंचायतीने हा रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावा, असा ठराव करून माण पंचायत समितीकडे पाठवला होता. पुढे पंचायत समितीने या रस्त्याचा ठराव सातारा जिल्हा परिषदेकडे पाठवून दिला. त्याला १७ महिन्यांचा कालावधीही लोटला. पण, जिल्हा परिषदेने हा ठराव आजअखेर एकाही सभेपुढे मांडला नाही. त्यामुळे नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेला शासन दिरंगाईही तितकीच जबाबदार असल्याचे मत अनेकांनी व्यक्‍त केले आहे. 

म्हसवडच्या दक्षिण दिशेस तेरा किलोमीटरवरील जांभूळणीनजीकच्या डोंगरावर अनेकांचे कुलदैवत श्री भोजलिंग देवस्थानचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी विजयादशमीस मोठी यात्रा भरते. हजारोंच्या संख्येने भाविक येथील यात्रेस येतात. म्हसवड यात्रा, रविवार, अमावस्या, पौर्णिमा यावेळी व वर्षभर लाखो भाविक डोंगरावर देवाच्या दर्शनासाठी येत असतात. डोंगरमाथ्यावरील मंदिराच्या दर्शनाला येण्या-जाण्यासाठी पूर्वी पायवाटच होती. पण, भाविकांच्या मदतीने चारचाकी वाहने वर जाऊ शकतील असे डोंगराच्या पूर्व व पश्‍चिम दिशेच्या बाजूने दोन कच्चे रस्ते २००९ मध्ये तयार करण्यात आले. त्यानंतर २०११ पासून भाविकांच्या वाहनांसाठी ते खुले झाले. हा सुमारे अडीच किलोमीटरचा टप्पा असून, तो माती, मुरमाचा आहे. काही ठिकाणी अरुंद व वळणावळणांचा रस्ता आहे तर संरक्षक कठडेच नसल्याने मोठा धोका आहे. 

सध्या हा रस्ता ग्रामपंचायतीकडेच असल्याने रस्त्याच्या कामाला निधीची अडचण निर्माण होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने हा रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा ठराव करून माण पंचायत समितीकडे दिला. पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने हा प्रस्ताव जुलै २०१७ मध्ये जिल्हा परिषदेकडे पाठवून दिला. पण, आजही तो प्रस्ताव जिल्हा परिषदेत धूळ खात पडून आहे. हा ठराव जिल्हा परिषदेने मंजूर केला असता तर या रस्त्याच्या कामाला गती येऊन निधीची तरतूद होऊ शकली असती. हा रस्ता सुरक्षित व पक्का झाला असता तर चार भाविकांचे प्राणही वाचले असते, अशीही चर्चा परिसरात आहे. 

मृतांच्या वारसांना मदत अपेक्षित
भोजलिंग डोंगरावरील दर्शन आटोपून परतत असणाऱ्या भाविकांची जीप खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. त्यात चार महिलांचा मृत्यू झाला. तर, १२ महिला जखमी झाल्या. त्यामुळे त्यांच्या वारसांना व जखमींना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Who is Responsible for Bhojling Accident