
सांगली- सांगलीत विजयनगर, विश्रामबाग अशा हार्ट ऑफ सिटीमध्ये "कोरोना' चा रुग्ण सापडला. ही बातमी कानावर पडताच "अफवा तर नाही ना', असे म्हणतच सांगलीकर झोपेतून जागे झाले. पण दुर्दैवाने... ही बातमी खरी ठरली. हा रुग्णाचा आजच सायंकाळी मृत्यूही झाला. त्यामुळे सांगली आता खऱ्या अर्थाने "रेड झोन' मध्ये आले आहे. त्यामुळे सांगलीकरांची काळजी वाढली आहे. प्रशासनदेखील कोड्यात पडले आहे, की इस्लामपूरातून 26 पॉझिटिव्ह मिळाले. त्यांना सौदीच्या प्रवासाचा इतिहास होता. अर्थात त्याचे अहवाल निगेटिव्हदेखील आले. मात्र सांगलीत "कोरोना' घुसला कसा? हे कोडे कोणालाच उलगडेनासे झाले आहे.
सांगली जिल्ह्याचा कोरोना इतिहास पाहिला तर सौदीमधून जे चार रुग्ण पहिल्यांदा इस्लामपूरमध्ये 25 एप्रिल रोजी आढळले. त्यांच्या संपर्कात आलेले सुमारे 26 जण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व एकाच कुटुंबाशी संबंधित होते. तरीही इस्लामपूर शहर तीन दिवस पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मतदार संघातील हे प्रमुख शहर असल्याने असल्याने साऱ्या यंत्रणा तातडीने गतीमान झाल्या. मिरजेला यासाठी कोरोना विशेष रुग्णालय स्थापन झाले. कोरोना रूग्णालयाच्या विशेष अधिकारी डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम येथे दाखल झाली. सुरवातील आपण कोरोना चाचणीसाठी पुण्यावर अवलंबून होतो. आता सर्व चाचण्या मिरजेत होऊ लागल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन वर्षाच्या एका बाळासह 25 जण कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाने यासाठी राबविलेल्या यंत्रणेचे यामुळे कौतुकही झाले. सांगली पॅटर्न व इस्लामपूर पॅटर्न म्हणून याची राज्यभरात चर्चा सुरू झाली. त्यामुळे इस्लामपूर चिंतामुक्त झाले. पण तेथे जवळच असलेल्या रेठरे धरण येथे मुंबई प्रवासाची इतिहास असलेला एक बाधित रुग्ण आढळल्याने पुन्हा इस्लामपूर लॉकडाऊन करण्यात आले. इस्लामपूरमागचे "कोरोना' चे शुक्लकाष्ट काही संपत नव्हते. मात्र उर्वरीत जिल्ह्यात तो पसरू नये, म्हणून प्रशासनाने दक्षता घेतली. मात्र रविवारची पहाट आणि सायंकाळ एक धक्कादायक बातमी घेवून आली. ती म्हणजे विजयनगरभागात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आणि त्याचा मृत्यू झाला. बातमीने सांगलीकरांची झोपच उडाली आहे.
सकाळी सकाळी वॉटसऍपवरून मेसेज फिरू लागले. अफवांचा बाजार यापूर्वी खूप असल्याने पत्रकारांकडे खात्रीसाठी अनेकांचे फोन येऊ आले. पण अफवा तर नव्हतीच. तर खूप धक्कादायक बातमी होती. ती म्हणजे अत्यंत सुखवस्तू नागरिकांच्या विजयनगरमधील एक जण पॉझिटीव्ह आढळला. मामला सिरीयस निघाला. एकदम तिसऱ्या स्टेजला गेल्यानंतरच हा रूग्ण ऍडमिट झाला. ज्या मिरज रुग्णालयातून आतापर्यंत 26 रुग्ण बरे होऊन बाहेर पडले त्या ठिकाणी हा रुग्णाला एकदम आईसीयूत व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. सायंकाळी त्याच्या मृत्यूची बातमी येताच भिती आणखी वाढली. मुळात विजयनगर येथे हा राहणारा हा रुग्ण गणपतीपेठेत शाखा असलेल्या एका बॅंकेत कर्मचारी आहे. त्यामुळे तेथेही सन्नाटा पसरला. गणपतीपेठ तर शहराची मूळ राजधानीच. येथे जवळच अत्यंत दाटीने लोकवस्ती असलेला गावभाग, वखारभाग, गवळीगल्ली, मगरमच्छी कॉलनी आदी नदीकाठचा अत्यंत गर्दीचा परिसर. ही केंद्रे दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने सिल केली आहेत. त्यानंतर आज विजयनगरसह विश्रामबागमधील स्फूर्ती चौकापर्यंत आणि तिकडे कुपवाडपर्यंतचा परिसर सिल करण्यात आला आहे.
हे सगळे खरे असले आणि आता नागरिक बाहेर पडणार नाहीत हे नक्की. पण, सांगली शहरात कोरोना घुसला कसा, त्याला वाट दाखवली कोण हे कोडे काही सध्या तरी सुटत नाही. या प्रश्नाने संपूर्ण सांगली हादरून गेली आहे. या रुग्णाबाबतची बाहेरून आल्याचा कोणताही इतिहास प्रशासनाला सापडत नाही. या रुग्णाला त्रास होऊ लागल्यानंतर तो चांदणी चौकातील एका दवाखान्यात गेला. संबंधित डॉक्टरांनाही क्वारोंटाईन करण्यात आले आहे.
"कोरोना' ची बाधा होऊ नये म्हणून लोकांनी सारे उद्योग, व्यवसाय बंद करून गेला महिनाभर कोंडून घेतले होते. तरीही "कोरोना' सांगलीत शिरलाच. आता या रुग्णाचा शहरातील प्रवास शोधावा लागणार आहे. त्याच्या संपर्कात जे जे आले ते शोधणे सोपे नाही. पण या रुग्णास ज्या कोणी "कोरोना' चा प्रसाद दिला तो कोण ? हे शोधणे त्याहून अवघड असल्याचे एक डॉक्टर म्हणाले. कारण जोपर्यंत कोरोनाचा विषाणू कॅरी करून सांगलीत आणला...तो नेमका कोठे राहतो...तो आणखी कोणाच्या संपर्कात आहे...हे रहस्य शोधणे हे प्रचंड आव्हान प्रशासनापुढे आहे. आता भाजीसाठी गर्दी किंवा वस्तुसाठी गर्दी करणे हिताचे नाही. कारण आपल्यापुढे जो कोणी संपर्कात येईल, तो "कोरोना' चा "सायलेंट कॅरीअर' असेल तर विषाणुंच्या जाळ्यात आपण अलगदपणे अडकणार आहोत. विजयनगरची चेन जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत तो कोण "सायलेंट कॅरीअर' बनून कोरोना पसरवत आहे हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्ट करण्याशिवाय पर्याय नाही अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांनी यामुळे आपल्या ओपीडीदेखील बंद केल्या होत्या. कारण असे रुग्ण हाताळण्यासाठी जे किटस लागतात ते सर्वांकडे नाहीत. मात्र त्यातूनदेखील अनेक डॉक्टरांनी धाडस करून ओपीडी सुरू ठेवल्या. ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या रुग्णांना उपचार मिळत होते. पण विजयनगर प्रकरणाने आता सारेच भयभित झालेत. या 47 वर्षीय बाधित रुग्णामुळे 27 लोकांना क्वारोंटाईन करावे लागले. त्यांच्या संपर्कात आलेली माणसे शोधण्याचे काम प्रशासन सुरू आहे. खरे तर प्रशासनाला भल्या पहाटेच हा धक्का बसला. त्यानंतर गणपती पेठेतील ती बॅंक सॅनीटाईझ्ड करून बंद करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. या बॅंकेशी ज्यांचा संबंध आला आहे अशा सर्वांना चाचण्या करून घ्याव्या लागतील. सर्व सीमा बंद करूनसुध्दा "कोरोना' घुसला कसा ? हे कोडे सोडवण्यासाठी आता संबंधित रुग्णाच्या घरातील सदस्यांकडूनच माहिती घ्यावी लागेल.
काही तज्ज्ञांशी "कोरोना' थेट संपर्काशिवाय कशातून पसरू शकतो याबाबत चर्चा केली असता, अनेक गोष्टी समोर आल्या. त्या म्हणजे हाताळत असलेल्या नोटांपासून विविध ठिकाणाहून घेत असलेल्या वस्तूपर्यंत आणि ज्या भागात कोरोनाचा रुग्ण येवून गेला असेल त्या ठिकाणी हवेत सुध्दा काही काळ तो राहात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.