esakal | माणमध्ये युतीचा उमेदवार कोण ?  गोरे बंधूंच्या प्रवेशाने पेच
sakal

बोलून बातमी शोधा

माणमध्ये युतीचा उमेदवार कोण ?  गोरे बंधूंच्या प्रवेशाने पेच

राज्यात भाजप-शिवसेनेची युती असली तरी या दोन्ही पक्षांत गोरे बंधूंनी केलेल्या प्रवेशाने माण मतदारसंघाची जागा कोणाला सुटणार, याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता आहे.

माणमध्ये युतीचा उमेदवार कोण ?  गोरे बंधूंच्या प्रवेशाने पेच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदवले : पक्षांतरच्या फेऱ्यांनी आता माणमध्ये युतीकडून कोणाला विधानसभेची उमेदवारी मिळणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यातच शिवसेना-भाजप प्रवेशामुळे गोरे बंधूंना अडविण्यासाठी एकत्र आलेल्यांनाच आता अडविण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसोशीचे प्रयत्न करावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
लोकसभा निवडणुकीतील घडामोडीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माण विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन गोरे बंधूंना अडविण्यासाठी "आमचं ठरलंय'चा नारा दिला. त्यातच सुरवातीला शेखर गोरेंनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राजकारणातील आराखडे बदलले. युतीचा हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने शेखर गोरे हेच युतीचे उमेदवार राहणार, याबाबत चर्चा झडू लागल्या. मात्र, मतदारसंघातील शिवसेना नेत्यांकडून मात्र याबाबत अजून तरी कसलीच चर्चा होत नसल्याने हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात राहिला आहे. त्यातच आता आमदार जयकुमार गोरेंच्या भाजप प्रवेशाने अधिकची भर पडल्याचे दिसते. 
कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या आमदार गोरेंनी रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करून जिल्ह्याला आपली ताकद दाखवून दिली होती. त्याहीपेक्षा खरी ताकद त्यांनी रणजितसिंहांना भाजपमध्ये पाठवून निवडून आणून दाखवली. त्यानंतर मात्र कॉंग्रेसचे जयाभाऊ हे नेहमीच भाजपच्या खासदारांबरोबर दिसले. त्यावरून विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपत जाण्याची चिन्हे दिसली. आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरल्याने आता त्यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. खरं तर माण विधानसभा मतदारसंघातून युतीकडून आजअखेर शिवसेनेने निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेना दावेदार आहे. मात्र, आता आमदार गोरेंच्या भाजप प्रवेशामुळे युतीकडून गोरे बंधूंतील कोण उमेदवार असणार? याबाबतही जाणकारांकडून तर्क लढविले जात आहेत. 
गोरे बंधूंना अडविण्यासाठी एकत्र आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शिवसेना-भाजपचे कट्टर कार्यकर्तेदेखील आहेत. त्यामुळे पक्षाकडून आदेश आल्यास हे कार्यकर्ते गोरेंच्या मागे जाणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्याशिवाय गोरे बंधूंना शह देण्यासाठी आघाडीकडून कोण रिंगणात उतरविणार, हे पाहणेही औत्सुक्‍याचे ठरणार आहे. परिणामी, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बदलणारे रंग कोणाला लाल करणार, हे येणारा काळच ठरवेल. 


गोरे बंधूंतील बंडखोरी कोण करणार? 
राज्यात भाजप-शिवसेनेची युती असली तरी या दोन्ही पक्षांत गोरे बंधूंनी केलेल्या प्रवेशाने माण मतदारसंघाची जागा कोणाला सुटणार, याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता आहे. मात्र, ज्या मतदारसंघातील विद्यमान आमदार भाजपकडे असेल तिथे भाजपचा उमेदवार असेल, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यामुळे जयकुमार गोरेंना युतीची उमेदवारी मिळणार का? आणि तसे झाले तर शेखर गोरे कोणता निर्णय घेणार? याकडेही सर्वांचे लक्ष आहे. परंतु; काहीही झाले तरी निवडणुकीत उमेदवारीचा विडा उचललेल्या गोरे बंधूंपैकी एकाला बंडखोरी करावी लागण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

loading image
go to top