आयुक्तांचा बंगला बुडाल्यास जबाबदार कोण? कुणी केला सवाल वाचा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

यंदाच्या संभाव्य महापुरात वर्षभरात कोट्यवधींचा खर्च केलेल्या आयुक्तांच्या बंगल्याचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची

सांगली : यंदाच्या संभाव्य महापुरात वर्षभरात कोट्यवधींचा खर्च केलेल्या आयुक्तांच्या बंगल्याचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, पुरात महापालिकेच्या दस्तऐवज-कागदपत्रांचे नुकसान झाल्यास आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा का, असे सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आले आहेत. संभाव्य महापुराच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन नागरिकांना स्थलांतर होण्यासाठी नोटिसी देत आहे, या पार्श्‍वभुमीवर त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, उपाध्यक्ष संदीप टेंगले, सचिव आशिष कोरी यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे, की प्रशासन महापूर येणार असे गृहित धरून नागरिकांमध्ये विश्‍वासाचे नव्हे तर भीतीचे वातावरण तयार करीत आहे.

खासगी भूखंड स्वच्छ न केल्यास, स्थलांतर न केल्यास फौजदारी गुन्ह्यांची भीती घातली जात आहे. त्याप्रमाणेच नागरिकांतर्फे आम्ही काही प्रश्‍न उपस्थित करीत आहोत. महापालिकेचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने कोणती दक्षता घेतली आहे,

गेल्या वर्षीच्या दस्तऐवजाची नव्याने निर्मिती झाली का? पूरपट्ट्यातील आयुक्त बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च केला आहे. मग आता नुकसान झाले तर त्याची जबाबदार कोणाची, महापालिकेच्या मालकीचे मैदान व भूखंडाची डबकी झाली असतील आणि त्याचा त्रास नागरिकांना होत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची, या प्रश्‍नांची उत्तरे आयुक्तांनी द्यावीत. हे म्हणजे "लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण' असा प्रकार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will be responsible for the sinking of Commissioner's bungalow?