कोविड सेंटरमधील कपडे धुणार कोण?; प्रश्‍न बनतोय जटिल... वाचा काय काय आहेत करणे

अजित झळके 
Friday, 18 September 2020

कोरोना रुग्णालयातील बेडशिट, उशांचे कव्हर धुवायचे कुणी आणि कसे, हा प्रश्‍न सध्या थोडासा गुंतागुंतीचा झाला आहे. विशेषतः जिल्हा परिषद, महापालिका आदी शासकीय यंत्रणांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये ही अडचण निर्माण होत आहे.

कोरोना रुग्णालयातील बेडशिट, उशांचे कव्हर धुवायचे कुणी आणि कसे, हा प्रश्‍न सध्या थोडासा गुंतागुंतीचा झाला आहे. विशेषतः जिल्हा परिषद, महापालिका आदी शासकीय यंत्रणांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये ही अडचण निर्माण होत आहे. बड्या खासगी रुग्णालयांत त्यासाठी कपडे धुण्याची यंत्रे आहेत. कामगार महिलांनी थोडे अधिक मानधन घेऊन त्याला तयारी दर्शवली आहे. अन्यत्र लॉंड्री असोसिएशनने कोविड रुग्णांचे कपडे धुण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. मुद्दा छोटा, मात्र क्‍लिष्ट आहे. जसजशी कोविड केअर सेंटर वाढत जातील, तसतसा हा प्रश्‍न गुंतागुंतीचा होत जाण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात सध्या सुमारे अडीच हजार रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यात सरकारी, खासगी, कोविड केअर सेंटरचा समावेश आहे. खासगी रुग्णालये, मोठी शासकीय रुग्णालये येथे कपडे धुण्याची सोय आहे. नव्याने सुरू झालेली कोविड केअर सेंटर, "आदिसागर'सारखे मोठे सेंटर येथे कपडे धुवायचे कुणी, हा प्रश्‍न पुढे आला. कोरोनाबाधित रुग्ण ज्या बेडवर उपचार घेतोय, त्यावरील बेडशिट धुवायची म्हणजे धोकाच, ही भीती आहे. यावर काहींनी मार्ग काढलाय. काही ठिकाणी धडपड सुरूच आहे. 

"वापरा व फेका' ठरले निरुपयोगी 

वापरा आणि फेका पद्धतीच्या बेडशिट बाजारात आल्या. त्या थोड्या महागड्या होत्या, शिवाय प्लास्टिकपासून बनवलेल्या असल्याने रुग्णांना त्रास झाला. त्यांना समाधान मिळेना. शिवाय त्या कमी आकाराच्या असल्याने गादीवर टिकेनात. त्यांचा वापर बंद करावा लागल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. आता कापड वापरणे आणि सुरक्षितपणे ते धुणे, हाच पर्याय आहे. 

मानधनात वाढ 

खासगी रुग्णालयांत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाने मानधन-पगार या संकटामुळे वाढवून घेतले आहेत. कोविडशी लढ्यात डॉक्‍टर, परिचारिकांचे स्थान मोठे आहेच; मात्र झाडू मारणारी, फरशी पुसणारी, कपडे धुणारी मावशी... हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. हे सारेच कोविड योद्धे आहेत. ते धोका पत्करून काम करत असल्याने त्यांना योग्य सन्मान देणे आणि थोडे अधिक मानधन देणे ही काळाची गरज असल्याचे एका डॉक्‍टरांनी खासगीत सांगितले. 

पीपीई कीटऐवजी कापडी गाऊनच! 

पुण्यात काही ठिकाणी पीपीई कीटऐवजी कापडी गाऊनचा वापर सुरू झाला आहे. हाही मार्ग चांगला असल्याचे डॉ. अनिल मडके यांनी सांगितले. गळ्याबरोबर गाऊन शिवले तर अडचण नाही. ते रोजच्या रोज धुता येतात. ते नष्ट करण्याची समस्या सुटेल. आता पीपीई कीटचे होतेय काय, हाही संशोधनाचाच विषय आहे. या स्थितीत मास्क उपयुक्त असेल, तर मग गाऊनही उपयुक्त आहेत. त्याने पूर्ण शरीर कव्हर होऊ शकते. पीपीई कीटमध्ये गरम होते, कार्यक्षमता कमी होते. पीपीई कीट डॉक्‍टर, परिचारिका, मावशी या साऱ्यांना लागते. कापडी शिवल्यास आर्थिक बचत होईल; मात्र ते धुवायचा प्रश्‍न आहेच. 

यावर उपाय काय? 
डॉ. अनिल मडके म्हणाले, ""कोरोना रुग्णालयातील बेडशिट, उशाचे कव्हर धुणे हा प्रश्‍न आहेच, मात्र पूर्ण काळजी घेतली तर धोका नाही. आम्ही बेडशिट आणि कपडे आधी सॅनिटाईझरमध्ये बुडवतो. ते काम करणारे लोक "एन 95 मास्क' किंवा डबल मास्क, ग्लोव्हज्‌ वापरतात. सॅनिटाईझ केल्यानंतर काही काळ ते भिजवत ठेवले जाते. हे कपडे स्वतंत्र ठिकाणी धुतले जातात. एकदा सॅनिटाझर वापरले किंवा कपडे धुण्याची पावडर वापरली तर विषाणू राहात नाही.'' 

आम्ही त्याला नकार दिला

होम क्वारंटाईन झालेल्या लोकांचे कपडे आम्ही धुतो. कोविड सेंटरमधील नाही. आदिसागरच्या कोविड सेंटरमधील कपडे धुण्याबाबत आमच्याकडे विचारणा केली होती. आम्ही त्याला नकार दिला. कारण त्यात धोका अधिक आहे. इतर वेळी काम करताना मास्क लावतो. हाताला ग्लोवज्‌ घालतो. त्यामुळे आजपर्यंत कुणीही बाधित झालेले नाही. 
- गोपाळ पवार, अध्यक्ष, लॉंड्री असोसिएशन, सांगली. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will do the laundry at the Covid Center ?; The question becomes complicated in Sangali