सरपंच पदाची लॉटरी कोणाला?; सांगली जिल्ह्यातील 699 गावांच्या सरंपचपदासाठी आज सोडत

विष्णू मोहिते
Friday, 29 January 2021

सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालानंतर सरपंच पदाच्या आरक्षणाकडे राजकीय मंडळींचे लक्ष आहे.

सांगली : जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालानंतर सरपंच पदाच्या आरक्षणाकडे राजकीय मंडळींचे लक्ष आहे. जिल्ह्यातील सर्व म्हणजे 699 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी उद्या (ता.29) सोडत काढण्यात येईल. दहा तालुक्‍यांच्या ठिकाणी एकाच दिवशी सोडत होईल. त्यानंतरच गावचा कारभारी कोण, हे ठरणार आहे.

गाव जिंकले, पण सरपंच आपलाच होईल का, याबाबतची धाकधूक आता वाढली आहे. जुने आरक्षण बाजूला ठेवून उर्वरित प्रवर्गातून सोडत पद्धतीने चिठ्ठया काढल्या जाणार आहेत. संबंधित तालुक्‍याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नियमानुसार तरतुदीनुसार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. 

जिल्ह्यामधील 699 रामपंचयतींसाठी सन 2020 ते 2025 कालावधीसाठी सरंपचपदाचे आरक्षण संबंधित तालुक्‍याच्या तहसील कार्यालयामध्ये काढले जाईल. तालुक्‍यामधील एकूण ग्रामपंचायतींच्या बाबतीत सरपंच आरक्षण काढण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना पर्यवेक्षीय करण्यासाठी तसेच संबंधित तहसीलदार यांना आरक्षण काढण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. सरपंच पदासाठी आरक्षण काढताना 1995 पासूनच्या आरक्षणाचा विचार केला जाईल. आरक्षण एकाच दिवशी पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच सदरचे आरक्षण संबंधित तालुक्‍याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नियमावतील तरतुदीनुसार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत. 

राज्यातील 14 हजार 234 तर जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली आणि निकालही लागला. जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. गावांत सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेही निश्‍चित झाले आहे. या निवडणुकीत सरपंच कोण होणार, हे माहिती नाही. त्यामुळे कोणते आरक्षण लागू होणार याबाबतची उत्सुकता गावागावांत निर्माण झाली आहे. सध्या आरणक्षासाठी कोण-कोणते प्रवर्ग शिल्लक आहेत, याचा हिशेब लावला जात आहे. गेल्या पाच-दहा वर्षांतील आरक्षण वगळून अन्य प्रवर्गात संधी मिळणार आहे. त्यात सन 2011 सालची लोकसंख्या गृहीत धरून मांडणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय कोणत्या प्रवर्गाला किती, महिला किती, याचा तक्ता तयार आहे. त्यानुसार तालुक्‍यात आरक्षण निश्‍चित केले जाईल. 

सत्ता एकाची...सरपंच दुसऱ्या गटाचा... 
यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये थेट जनतेतून सरपंच निवड होत होती. ती राज्य शासनाने रद्द करून, पुन्हा सदस्यांतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. त्याचे स्वागतही झाले, मात्र त्यानंतर निवडणूक पश्‍चात सरपंच निवडीचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबत उलट-सुलट मतप्रवाह आहेत. त्याला आक्षेपही घेण्यात आला आहे. आता सरपंच निवडीत काय होते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. काही ठिकाणी सत्ता एकाची आणि सरपंच दुसऱ्याचा, असे होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will win the Sarpanch lottery ?; Leaving today for the Sarpanchpada of 699 villages in Sangli district