हा सारा खेळ ऑक्‍सिजनचा; डॉक्‍टरांचा व्हिडिओ जयंत पाटील यांच्याकडून "व्हायरल' , काही नेटिझन्सनी केले ट्रोलही

अजित झळके
Sunday, 6 September 2020

जयंतरावांनी शेअर केलेल्या व्हिडिओतील डॉक्‍टर कोण आहेत, हे स्पष्ट होत नाही. परंतू, ते अतिशय गांभिर्याने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने कोरोना बाधितांना धीर देत आहेत.

सांगली ः कोरोना रुग्णांना धीर देणारा, त्यांना स्वतःची देखभाल स्वतः कशी करता येईल हे सांगणारा एक व्हिडिओ पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्हायरल केला आहे. फेसबुकवर तो तब्बल 82 हजार लोकांनी पाहिला असून त्यात एक तरुण डॉक्‍टर "हा सारा खेळ ऑक्‍सिजनचा' हे समजावून सांगत आहेत. लोकांनी घाबरून न जाता "होम आयसोलेशन'ला प्राधान्य दिले पाहिजे, असा संदेश त्यात आहे. 

रुग्णालयावरील वाढता रुग्णांचा भार कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पालकमंत्र्यांनी हा प्रयत्न केला आहे. त्याला काही नेटिझन्सनी ट्रोलही केले आहे. डॉक्‍टरांनी सांगण्याची वाट कशाला पाहताय, सरकार तुमचे आहे, हे धोरण म्हणून का राबवत नाही, असा सवालही काहींनी केला आहे. काहींनी जयंतरावांनी ऑक्‍सिजन तपासणारे मीटर घराघरात वाटायला काय हरकत आहे, असा सवाल केला आहे. 

जयंतरावांनी शेअर केलेल्या व्हिडिओतील डॉक्‍टर कोण आहेत, हे स्पष्ट होत नाही. परंतू, ते अतिशय गांभिर्याने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने कोरोना बाधितांना धीर देत आहेत. कोरोना फार गंभीर नाही, तो पंधरा दिवसांत बरा होतो, तुम्ही ऑक्‍सिजन तपासत राहा, ते 90 पेक्षा कमी आले तरच रुग्णालयात भरती व्हा. तोवर घरी राहा, असा सल्ला ते देत आहेत. अतिशय थकवा आला तर समजा की कोरोना वाढतोय. तोवर ताप आला तरी फार चिंता करण्याचे कारण नाही, असेही या डॉक्‍टर युवकाने सांगितले आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. जयंतरावांसोबत हजारो लोकांनी तो शेअरही केला आहे. 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून ती सोळा हजाराचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. वैद्यकीय पंढरीवर प्रचंड ताण आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनीही "बेड अडवून ठेवू नका', असे आवाहन करत प्रकृती ढासळत असलेल्या रुग्णांसाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याचे आवाहन डॉक्‍टरांना केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This whole game is about oxygen; Doctor's video 'viral' from Jayant Patil, some netizens even trolled