आम्हा ‘सरकार’ म्हणेना ‘आपुले’!

शैलेन्द्र पाटील
मंगळवार, 23 मे 2017

वनमजुरांची २० वर्षांपासूनची व्यथा; निवृत्ती जवळ आली तरी इमानेइतबारे सेवा
सातारा - कोणाच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे भरायचेत, तर कोणाची मुलगी लग्नाला आली आहे... तुटपुंजा पगार, वाढलेले वय, पीएफ नाही की ग्रॅच्युइटी नाही... २०-२२ वर्षे इमानेइतबारे सरकारी सेवा करूनही कधी वडिलांच्या नावावर तर कधी पत्नीच्या नावावर त्यांचा पगार निघतो. निवृत्तीसाठी काही वर्षे शिल्लक राहिली, तरी शासन अजूनही त्यांना आपले म्हणेना आणि हेच या सरकारी असूनही बिगर सरकारी कर्मचाऱ्यांचे दुखणे आहे! 

वन्यजीव विभागातील बामणोली परिक्षेत्र कार्यालयात रामचंद्र चिमाजी जाधव (वय ४४), आनंद कोंडिबा पवार (वय ४४, दोघेही रा. रा. पावशेवाडी, ता. जावळी) व रामचंद्र लक्ष्मण कदम (वय ४६, रा. वाघळी, ता. जावळी) हे तिघेही वनमजूर म्हणून कार्यरत आहेत. साधारण १९९६-९७ मध्ये काही महिन्यांच्या फरकाने तिघेही वन्यजीव विभागात नोकरीस लागले. ३८ रुपये दहा पैसे रोज या दराने त्यांनी कामाला सुरवात केली. तिघेही वनमजूर म्हणून काम करतात. नंतर गरजेनुसार कोणाला कार्यालयीन संरक्षण मजूर म्हणून, तर कोणाला पर्यटक तपासणी मदतनीस म्हणून काम करावे लागते. गेल्या २०-२२ वर्षांत तिघांबाबत एकही तक्रार नाही.

आज ना उद्या सरकार आपल्याला कायम करेल, या आशेवर ते समोर येईल ते काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. नोकरीस लागल्यापासून विनाखंड ते काम करत आहेत. नोकरी हे करत असले तरी रेकॉर्डवर कधी वडिलांच्या नावे, कधी आईचे नावे तर कधी पत्नीच्या नावाने पगार काढला जातो.

वर्षातील केवळ तीन महिनेच त्यांना रेकॉर्डवर नोकर म्हणून दाखवले जाते. या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागून नोकरीस लागलेल्या वनमजुरांना कायम केले आहे. त्यांना कामगार म्हणून शासनाचे सर्व लाभ मिळतात. हे तिघे मात्र वंचित राहिले आहेत. तिघांनीही वयाची चाळीशी पार केली आहे. कोणाच्या मुलीची नुकतीच बारावी झाली आहे. तिला पुढील शिक्षणाच्या सोयीसाठी सातारला किंवा अन्य ठिकाणी ठेवावे लागणार आहे. कोणाच्या मुलाच्या नोकरीची धडपड सुरू आहे. वृद्ध पालकांच्या आजारपणामुळे आर्थिक ओढाताण सुरू आहे. शासन या कर्मचाऱ्यांना आपले कधी म्हणणार, हा खरा प्रश्‍न आहे? 

माणुसकीचे दर्शन घडावे! 
वर्षातील २४० दिवस याप्रमाणे सलग पाच वर्षे सेवा झालेल्या वनमजुरांना शासनाच्या सेवेत कायम केले जाते. या तिघांची २० ते २२ वर्षे सेवा झाली आहे. मात्र, त्यांचे कधीही २४० दिवस भरून दिले गेले नाहीत. कधी पत्नीच्या तर कधी वडिलांच्या नावे पगार काढले गेले. हा अन्याय त्यांच्यावर का व कोणी केला, याच्या खोलात शिरण्यापेक्षा त्यांचे होत असलेले नुकसान भविष्यात थांबवण्यासाठी त्यांना सेवेत कायम करणे माणुसकीच्या भावनेतून गरजेचे आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wild labour conditition