गवा, बिबट्या आला तर... तयारी शून्य! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

पुण्यातून धडा घेणार का?; सांबर मारल्यानंतर काहीच बदल नाही 

सांगली : पुण्यात गवा घुसला आणि पुणेकरांच्या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी धावता-धावता तो मेला. त्याला पकडण्यात अपयश आले, कारण तशी यंत्रणाच पुण्यातील वन विभागाकडे नव्हती. आता पुणेकरांनी शहाणपण घेतले आहे आणि असे वन्यप्राणी शहरात घुसले, तर त्यांना पकडण्यासाठी तज्ज्ञांचे पथक तयार करण्याचे ठरले आहे. असे वन्यजीव सांगलीत पुन्हा आले तर... सांगलीकरांची तयारी आजही शून्य आहे. इथल्या वन विभागाकडे पुरेशी सामग्री नाही आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची वानवाच आहे. 

सांगली, मिरज शहरे कृष्णा नदीच्या काठावर आहेत. जिल्ह्याच्या पश्‍चिम सीमेवर चांदोली हे राष्ट्रीय अभयारण्य आहे. तेथे पाच वाघ, 35 हून अधिक बिबट्यांची संख्या आहे. कोकणचा घाट शंभर किलोमीटरवर आहे. जिल्ह्यातच सागरेश्‍वर अभयारण्य आहे. तेथे सांबर, हरणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे वन्यजीव भरकटले आणि सांगलीत आले तर काय? या आधीही असे घडले आहे. अलीकडेच सागरेश्‍वरजवळ बिबट्याचे दर्शन झाले होते. तेथे बिबट्यांची संख्या एकाहून अधिक असावी, असा वन विभागाचाच अंदाज आहे. 

या आधी सांगलीत वन्यजीव भरकटून आले होते. दहाएक वर्षांपूर्वी येथील वसंतदादा शासकीय रुग्णालय परिसरात एक गवा घुसला होता. त्याला पकडण्यात यश आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. त्यावेळीही यंत्रणा कमी पडली होती. 9 मार्च 2014 रोजी बिरनाळे हायस्कूल परिसरात सांबर घुसले. प्रचंड गदारोळ झाला. त्याला पकडण्यासाठी प्रचंड शर्थ करावी लागली. ते सापडले; मात्र हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. 2017 मध्ये गणपती मंदिरामागील बाजूला गव्याचे दर्शन झाले. तेथे नागरिकांनी त्याला हुसकावले. वसंतदादा स्मारकापासून तो गायब झाला. तो पुन्हा दिसलाच नाही. 

दोन घटनांत मनुष्यहानी झाली नाही; मात्र दोन वन्यजीव गमावले. पुण्यातील घटनेनंतर सांगलीने धडा घेणे गरजेचे आहे. त्याबाबत वन विभाग काही हालचाली करेल, अशी अपेक्षा आहे. विभागीय वनाधिकारी श्री. दांडके यांना या क्षेत्राचा अनुभव आहे. त्यामुळे ते अभ्यास करून याबाबत निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. 

हेही वाचा- पाऊस व टेंभूचे पाण्यामुळे हजार हेक्‍टरने ऊस श्रेत्र वाढले -

समितीची बैठकच नाही 
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात प्राणी क्रूरता क्‍लेश नियंत्रण समिती आहे. तिची बैठक गेल्या आठ महिन्यांपासून झालेली नाही. त्यामुळे असे प्रसंग उद्‌भवलेच तर काय करावे, यावर चर्चा तरी कुठे होणार, असा सवाल प्राणिमित्र अजित काशीद यांनी उपस्थित केला. राज्याचे मानद वन्यजीव रक्षक अजित ऊर्फ पापा पाटील यांनी वन्यजीव भरकटण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. वन विभागाने जिल्ह्यात शिराळा पट्ट्यात गवा, बिबट्यांच्या तर जिल्ह्यात अन्यत्र मगर आणि माकडांच्या नियंत्रणासाठी नियोजन करावे लागेल, हे कबूल केले. 

वन्यजीव आल्यास तज्ज्ञांच्या सूचना 
* तत्काळ त्या भागात 144 कलमाद्वारे कडक जमावबंदी लावा 
* पोलिसांना ऍक्‍शन मोडमध्ये आणा 
* वन्यजीव पकडण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची पथके बनवा 
* भुलीचे इंजेक्‍शन देण्यासाठीची अत्याधुनिक सामग्री खरेदी करा 
* मोठे सापळे, जाळ्या, वागर यांची खरेदी गरजेची 

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wildlife Failure to catch sangli