बुद्धिबळ अभ्यासक्रमात येणार? नव्या शैक्षणिक धोरणात विचार 

घनशाम नवाथे 
Friday, 4 September 2020

देशात 34 वर्षानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवले जात आहे. या नव्या धोरणात कलेला वाव तसेच तार्किक क्षमता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर पाटी-पुस्तकांबरोबर बुद्धिबळ पट मांडण्याचा विचार सुरू आहे.

सांगली : देशात 34 वर्षानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवले जात आहे. या नव्या धोरणात कलेला वाव तसेच तार्किक क्षमता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर पाटी-पुस्तकांबरोबर बुद्धिबळ पट मांडण्याचा विचार सुरू आहे. बुद्धिबळाला प्रोत्साहन देण्याची नव्या धोरणात चर्चा सुरू आहे. सध्या काही शाळांत बुद्धिबळाचे प्रशिक्षण दिले जाते. परंतू नव्या धोरणात अंतिम निर्णयानंतर विद्यार्थ्यांला बौध्दिक व्यायाम मिळावा यासाठी बुद्धिबळातील चाली शिकवल्या जाऊ शकतात. 

शैक्षणिक धोरणात नर्सरी ते दुसरीपर्यंत पाच वर्षे मुलभूत शिक्षण, त्यानंतर तिसरी ते पाचवीपर्यंत तीन वर्षे प्रारंभिक आणि सहावी ते आठवीपर्यंत आणि नववी ते बारावी माध्यमिक असा पॅटर्न ठरवला आहे. नव्या धोरणात बुद्धिबळ खेळाचा शालेय शिक्षणात समावेश करण्याबाबत दोनवेळा चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बुद्धिबळच्या शिक्षणातील समावेशाचा उल्लेख केला आहे. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळून त्यांची तार्किक क्षमता वाढवण्यासाठी हा बदल सुरू आहे. इतर शैक्षणिक विषयांसोबतच आता ऑनलाईन आणि ऑफलाईन बुद्धिबळाचीही निश्‍चितच मदत होऊ शकते. काही शाळांमध्ये "चेस इन स्कूल' उपक्रमांतर्गत बुद्धिबळ खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. नवीन शैक्षणिक धोरणात सर्वच शाळांतून हा खेळ शिकवण्याबाबत विचार सुरू आहे. 

कोविड 19 मुळे सर्वच शाळा बंद आहेत. मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना निरोगी जीवनासाठी खेळ आणि शारीरिक व्यायाम आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे बौद्धिक विकासासाठी मेंदूच्या व्यायामाची देखील आवश्‍यकता आहे. तो बुद्धिबळातून मिळणार असल्यामुळे शैक्षणिक धोरणात समावेश होऊ शकतो. 

सध्या देशात हरियाणा, गुजरातसह काही ठिकाणी शाळांमधील अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश आहे. त्याच धर्तीवर देशात इतर राज्यात नव्या शैक्षणिक धोरणात बुद्धिबळाचा समावेश करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मुलांचा बौद्धिक विकास अधिक चांगल्याप्रकारे होऊ शकले, असा दुजोरा बुद्धिबळपटू देत आहेत. 

आमची ऍकॅडमीही पाठपुरावा करत आहे

अनेक राज्यातील शाळांत "चेस इन स्कूल' प्रोग्रॅम राबवला जात आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बुद्धिबळाचा विचार झाला आहे. त्यादृष्टीने ऍकॅडमीच्यावतीने एक रोड मॅप बनवत आहे. देशात काही राज्यात तसेच परदेशातील काही शाळांत राबवल्या जाणाऱ्या बुद्धिबळ अभ्यासक्रमाचा अभ्यास केला जात आहे. आमची ऍकॅडमीही पाठपुरावा करत आहे. ऍकॅडमीतर्फे देश-विदेशातील खेळाडूंना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते. बुद्धिबळ प्रशिक्षणासाठी शासनाला मदतीची तयारी दर्शवली आहे.

- श्रेयस पुरोहित (प्रशिक्षक, पुरोहित चेस ऍकॅडमी)

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will chess introduce in school curriculum? Think of a new educational policy