एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार की कडू?

घनश्‍याम नवाथे 
Wednesday, 28 October 2020

कोरोना संकटानंतर एसटीची चाके धावायला लागली आहे, मात्र कर्मचाऱ्यांना आता दिवाळी कोड होणार की कडू, याची चिंता लागून राहिली आहे. आतापर्यंत दोन महिन्यांची पगार थकीत आहे. चालू महिन्यासह तीन महिन्यांचे पैसे मिळाले पाहिजेत, अशी मागणी जोर धरते आहे. त्यासाठी एसटी कामगार संघटनेतर्फे राज्यव्यापी "पगार दो' आक्रोश आंदोलन होणार आहे. 

सांगली : कोरोना संकटानंतर एसटीची चाके धावायला लागली आहे, मात्र कर्मचाऱ्यांना आता दिवाळी कोड होणार की कडू, याची चिंता लागून राहिली आहे. आतापर्यंत दोन महिन्यांची पगार थकीत आहे. चालू महिन्यासह तीन महिन्यांचे पैसे मिळाले पाहिजेत, अशी मागणी जोर धरते आहे. त्यासाठी एसटी कामगार संघटनेतर्फे राज्यव्यापी "पगार दो' आक्रोश आंदोलन होणार आहे. 

येत्या सोमवारी (ता. 2) हे आंदोलन होईल. त्यानंतरही पगार न मिळाल्यास कामगार व कुटुंबिय राहत्या घरासमोर 9 रोजी आक्रोश करतील, अशी माहिती विभागीय अध्यक्ष अशोक खोत, सरचिटणीस नारायण सूर्यवंशी यांनी दिली. 

ते म्हणाले, ""जुलै महिन्याचा थकीत पगार 7 ऑक्‍टोबरला देण्यात आला. परंतू तो देताना प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या कामगारांपैकी काहींचा रजा कालावधीचा पगार कपात करण्यात आला. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जुलै महिन्याचा पगार दिला असला तरी पुन्हा ऑगस्ट व सप्टेंबरचा पगार अद्याप मिळालेला नाही. तशातच ऑक्‍टोबरचा पगार देखील जवळ आला आहे. महागाई भत्ता व सण उचल देण्याच्या तरतुदीची अंमलबजावणी प्रशासनाने केलेली नाही. डिसेंबर 2019 पासून वाढीव पाच टक्के महागाई भत्ता अद्याप लागू केलेला नाही. कोरोनाच्या संकटात कामगार प्रतिकुल परिस्थितीत काम करत असताना त्यांची देणी मिळत नसल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.'' 

ते म्हणाले, ""नियमित तारखेस पगार देण्याची कायदेशीर जबाबदारी एसटी प्रशासन पार पाडत नाही. एसटीच्या बिकट आर्थिक परिस्थितीस कामगार जबाबदार नाहीत. दिवाळी सणापूर्वी ऑगस्ट, सप्टेंबरचा थकीत पगार आणि ऑक्‍टोबरचा पगार, महागाई भत्त्याची थकबाकी, सण उचल मिळावी यासाठी संघटनेच्यावतीने 2 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधतील. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन दिले जाईल. संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनाविरोधात तीव्र संघर्ष करावा लागेल.'' 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the Diwali of ST employees be sweet or bitter?