esakal | आरोग्याचा दिल्ली, केरळ पॅटर्न राबवू; जितेंद्र डुडी यांनी स्विकारला जि.प सीईओचा पदभार
sakal

बोलून बातमी शोधा

will Implement Delhi, Kerala pattern of health; Jitendra Dudi accepted the post of ZP CEO

कोरोनाशी लढा, हाच जिल्हा परिषदेचा प्राधान्याचा विषय असेल. मुंबई, पुण्यातून येणाऱ्या प्रत्येक संशयित रुग्णाची गतीने तपासणी करून त्याच्या जिविताचा धोका कमी करण्याचे धोरण राबवले जाईल.

आरोग्याचा दिल्ली, केरळ पॅटर्न राबवू; जितेंद्र डुडी यांनी स्विकारला जि.प सीईओचा पदभार

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : कोरोनाशी लढा, हाच जिल्हा परिषदेचा प्राधान्याचा विषय असेल. मुंबई, पुण्यातून येणाऱ्या प्रत्येक संशयित रुग्णाची गतीने तपासणी करून त्याच्या जिविताचा धोका कमी करण्याचे धोरण राबवले जाईल. जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात दिल्ली आणि केरळ राज्यांसारखा पॅटर्न राबवण्याबाबत मी आग्रही असेल, अशी भूमिका जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केली. 

श्री. डुडी यांनी आज दुपारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याकडून पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ""कोरोनाच्या संकटाशी लढणे, हाच जिल्ह्यात प्राधान्याचा विषय असेल. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यातून पुढे जायचे आहे. पुण्यातील या कामाचा अनुभव माझ्या गाठीशी आहे, मात्र इथली स्थिती वेगळी आहे.

इथे अतिशय चांगले नियोजन करण्यात आल्याने कोरोनाला आटोक्‍यात आणता आले आहे. तोच प्रयत्न पुढे सुरु राहील. मुंबई, पुण्यातून येणारे लोक लवकर रुग्णालयात यावेत, त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी व्हावी, त्यांना सर्व त्या आरोग्य सुविधा लवकर मिळाव्यात हे महत्वाचे असेल. कारण, त्यांच्या जिवाताचा विषय महत्वाचा आहेच, शिवाय त्यांच्यापासून इतरांना लागण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम केल्या जातील. कारण, पुढचे दोन महिने आव्हानात्मक असतील, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.'' 

ते म्हणाले, ""ग्रामीण विकास हा माझ्यासाठी पूर्ण नवा विषय नक्कीच नाही. याआधीच्या कामातून या विषयाशी संबंध आला आहे. त्यामुळे आरोग्य आणि शिक्षण या दोन विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. या काळात आरोग्याचा दिल्ली आणि केरळ पॅटर्न राबवण्याबाबत मी अभ्यास करतोय. "मोहल्ला क्‍लिनिक'सारख्या संकल्पनांचा त्यात समावेश असेल. केरळमधील काही संकल्पनांचा मी अभ्यास करतो आहे.'' 

संपादन : युवराज यादव