यामुळे होणार नियोजन कार्यालय लोकाभिमुख

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

  • इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन प्रणाली
  • निरनिराळ्या विभागात फाइल फिरवण्याची नाही पडणार गरज
  • प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून पूर्ण होईपर्यंतची अद्ययावत स्थिती

सोलापूर : जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्हा नियोजन कार्यालयातील कामकाज कागदरहित (पेपरलेस) होणार आहे.

हेही वाचा : ठाकरे मुख्यमंत्री होताच "ती' पोस्ट झाली व्हायरल

नियोजन विभागाचे कामकाज 1 एप्रिलपासून इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन प्रणालीद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे कुठलीही फाइल निरनिराळ्या विभागात फिरविण्याची गरज भासणार नाही. ही सर्व कामे संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहेत. जिल्हा नियोजन कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता आय-पास प्रणालीचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या वेळी श्री. दराडे यांनी याबाबत विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा : भ्रष्टाचारी, दुराचाऱ्यांना पाठीशी; या महापालिकेची पंरपरा

आय-पास संगणकीय यंत्रणा राज्यभरात कार्यान्वित केली जाणार आहे. नियोजन विभागातील टपालांचे व्यवस्थापन, कामांचे संनियंत्रण, कामाचे भौगोलिक स्थान, कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंतची अद्ययावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरांवरील डॅशबोर्ड यांचा समावेश प्रणालीत आहे. लोकप्रतिनिधी आणि कार्यान्वित यंत्रणा इंटरनेटद्वारे जोडल्या जाणार आहेत.

सुलभ, लोकाभिमुख व गतिमान कामकाज
प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामकाज सुलभ, लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. संबंधित विभागाच्या अधिकारी यांना आपल्या प्रस्तावाबाबत काय परिस्थिती आहे, निधी आला किंवा नाही, प्रस्ताव मंजूर झाला किंवा नाही हे दिसणार आहे.
- सर्जेराव दराडे, जिल्हा नियोजन अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This will make the planning office people oriented