सांगली महापालिकेत "व्हीप'ची पॉवर भाजपला तारणार?

Will the power of "whip" save BJP in Sangli Municipal Corporation?
Will the power of "whip" save BJP in Sangli Municipal Corporation?

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या सत्तेचा कौल सध्या तरी सत्ताधारी भाजपच्या बाजूने दिसत आहे. मात्र उद्या (ता. 23) होणाऱ्या महापौर पदासाठीच्या निवडणुकीनंतरही तो आपल्याच बाजूने रहावा, यासाठी भाजपने आपल्या सदस्यांना व्हीप बजावला आहे. ही व्हीपची पॉवर भाजपला तारणार की नाही? हे आज ठरणार आहे. त्याचबरोबर विरोधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपल्या सदस्यांना व्हीप बजावल्याने रंगत आणखी वाढली आहे.

भाजपने आमराई क्‍लब येथे अर्ज दाखल करण्याच्या दिवशी झालेल्या बैठकीत आपल्या नगरसेवकांना व्हीप (पक्षीय आदेश) बजावला आहे. तसेच प्रसार माध्यमातूनही "व्हीप'ची जाहिरात दिली आहे; तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. प्रत्येक सदस्याने आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारास मतदान करणे बंधनकारक केले आहे.

यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र व्हीप बजावला असला, तरी त्यांनी "व्हीप'मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संयुक्‍तपणे ठरवून दिलेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

या अधिनियमांचा भंग केल्यास सदस्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 (1987) चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 20 चा (3) नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाचे सदस्य व्हीपच्या दबावाने आपल्या उमेदवारांना मतदान करतील आणि कोण विरोधात करणार हे उद्याच मतदानानंतर स्पष्ट होईल. 

"नॉटरिचेबल'ची धाकधूक 
भाजपचे नऊ सदस्य अर्ज दाखल करण्याच्या दिवशीपासून नॉटरिचेबल आहेत. त्यातील दोघे शनिवारी भाजपच्या गोटात सामील झाले. मात्र अद्याप सातजण संपर्कात नाहीत. त्याचबरोबर कॉंग्रेसचेही नऊ सदस्य नॉटरिचेबल होते. त्यामुळे हे सदस्य उद्या महापौर, उपमहापौर मतदानावेळी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. पण, संपर्कात नसलेल्या सदस्यांना व्हीप मिळाला की नाही, त्यांनी पाहिला की नाही हे प्रश्‍न उपस्थित होत असल्याने प्रसारमाध्यमातून जाहिरात देऊन तीनही पक्षांनी आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधारी भाजपचे नॉटरिचेबल सदस्य राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते भाजपच्या उमेदवारांविरोधात मतदान करतील की गैरहजर राहतील की तटस्थ राहतील याबाबत चर्चा रंगली आहे; तर कॉंग्रेसचे नॉटरिचेबल सदस्य कोणती भूमिका घेणार ते गुलदस्त्यात आहे. मात्र व्हीपमुळे नॉटरिचेबल सदस्यांतही धाकधूक आहे. 

ऑनलाईन मतदान कसे होणार? 
महापौर निवडीसाठी प्रथमच ऑनलाईन ऍपद्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मतदान होत असल्याने उत्सुकता आहे. यामुळे प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहण्याची आवश्‍यकता नाही. मात्र सदस्याने आपले मोबाईल, लॅपटॉप पूर्ण चार्जिंग करुन ठेवावेत. जेथे रेंज येऊ शकते तेथे थांबावे. सदस्याने जो मोबाईल क्रमांक दिला आहे, त्यावर सभेची लिंक दिली जाणार आहे. त्या लिंकवरुन सदस्य सभेला उपस्थित राहू शकतात. हात वर करून मतदान करण्याचे आहे. 

काय कारवाई होऊ शकते? 
पक्षाचा आदेश अर्थात व्हीप डावलून जे सदस्य विरोधात मतदान करतील त्यांच्यावर सदस्यत्व रद्द होण्याची कारवाई होऊ शकते. मात्र त्याविरोधात 30 दिवसात विभागीय आयुक्तांकडे दाद मागावी लागते. तेथे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकालाविरोधात नगरविकास मंत्र्यांकडे अपील करता येते. तेथे सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागल्यानंतर तो मान्य नसल्यास त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागता येते. त्यामध्ये किती काळ जाणार हे सांगता येत नाही. शिवाय निकाल लागेपर्यंत सदस्यत्व रद्द होत नाही. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com