तिन्ही राजांचे सूत भाजपमध्ये जुळणार ? 

प्रवीण जाधव
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

सातारा ः उदयनराजेंशी झालेला संघर्ष हा शिवेंद्रसिंहराजे व विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या भाजपच्या जवळकीचा महत्त्वाचा मुद्दा असताना आता खासदार उदयनराजे भोसलेही त्याच वाटेने जाताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत न जुळलेले या तिघांचे सूत भाजपमध्ये जुळणार का, असा प्रश्‍न जिल्हावासीयांना पडला आहे. 

सातारा ः उदयनराजेंशी झालेला संघर्ष हा शिवेंद्रसिंहराजे व विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या भाजपच्या जवळकीचा महत्त्वाचा मुद्दा असताना आता खासदार उदयनराजे भोसलेही त्याच वाटेने जाताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत न जुळलेले या तिघांचे सूत भाजपमध्ये जुळणार का, असा प्रश्‍न जिल्हावासीयांना पडला आहे. 
उदयनराजे यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पूरगस्तांच्या प्रश्‍नासाठी ही भेट असल्याचे उदयनराजे यांच्याकडून सांगितले जात असले, तरी तेही भाजपच्या वाटेवर असल्याचा सूत्रांचा दावा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय अवकाशात चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वी उदयनराजेंसाठी राष्ट्रवादीच्या चिन्हावर मत देणाऱ्या आणि उदयनराजेंना विरोध म्हणून धनुष्यबाणाचे बटण दाबणाऱ्या दोन्ही मतदारांमध्ये चर्चेचा धुरळा उडालेला आहे. कार्यकर्त्यांनाही काय बोलावे, असा प्रश्‍न पडला आहे. ही उदयनराजेंची नेहमीप्रमाणे चकवा देणारी खेळी आहे, की अस्तित्व टिकवण्यासाठीची राजकीय मुत्सद्देगिरी, अशा विविध विषयांचा या चर्चेत समावेश आहे. त्यात सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा चर्चिला जातोय तो उदयनराजेंना कंटाळून राष्ट्रवादीला रामराम ठोकलेले शिवेंद्रसिंहराजे व त्या तयारीत असलेले रामराजे नाईक-निंबाळकर यांची उदयनराजेंमुळे पुन्हा एकदा राजकीय अडचण होणार का? 
उदयनराजेंवर दाखल झालेले खंडणीप्रकरण व सातारा पालिका निवडणुकीनंतर या तिघांमधील संघर्षाला जिल्ह्यात चांगलीच धार चढलेली होती. एकमेकांवर अत्यंत टोकाचे आरोप झाले. अनेकदा प्रकरण हातघाईवरही आले. त्यातून उदयनराजेंविरोधात जिल्ह्यातील सर्व आमदारांची मोट बांधली गेली. आमदारांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. एवढ्यावरच न थांबता उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी टोकाचा विरोध करण्यात आला; परंतु पक्षाध्यक्ष शरद पवारांनी उदयनराजेंच्या पारड्यात उमेदवारीची माळ टाकली. त्या वेळी सर्वांमध्ये समेट घडवून आणला, असे पक्षाकडून सांगण्यात आले. निवडणुकीनंतर लगेचच उदयनराजेंनी दोघांवर पुन्हा टीकेची झोड उठवली. त्यानंतर मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथीला वेग आला. शिवेंद्रसिंहराजेंनी टोकाचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला. रामराजेही त्याच वाटेवर असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे राजकारण सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून पुन्हा या दोघांच्या हातात येईल, अशी शक्‍यता निर्माण झाली होती; परंतु या तर्काला काल उदयनराजेंसदर्भातील दाव्याने धक्का पोचणार आहे. उदयनराजेंचा स्वभाव पाहता भाजपमध्ये गेल्यावरही त्यांच्या भूमिकेत फारसा काही फरक पडेल, असे नाही. उदयनराजेंच्या "मी मिरवणार, सर्वांची जिरवणार,' या कार्यपद्धतीमुळे राष्ट्रवादीमध्ये बिनसलेल्या या त्रिकुटाचे सूत भाजपमध्ये जुळणार की, पुन्हा मागचे दिवस पुढे अशीच राजकीय सर्कस सुरू राहणार, असा प्रश्‍न जिल्हावासीयांना पडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will the three kings' yarn match in BJP?