स्वबळाच्या तयारीत सेनेचे इच्छुक कामाला

उमेश बांबरे
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यातील मतदारसंघांतील परिस्थिती जाणून घेतली.

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने "मेगा भरती'च्या माध्यमातून 288 जागांची तयारी करत आहे, तर शिवसेना युती होईल या आशेवर बसली आहे. भाजपचे मनसुबे ओळखून शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सर्व जिल्हाप्रमुखांना स्वबळाची तयारी ठेऊन कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी विधानसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत आणखी काही दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीत सेना भाजपची युती होणार हे निश्‍चित मानले जात आहे; पण भाजपने सुरू केलेल्या "मेगाभरती'मुळे प्रत्येक मतदारसंघात त्यांनी उमेदवार तयार ठेवलेला आहे, तसेच शिवसेनेच्या वाट्याच्या जागांवरही भाजपने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे युती होणार का याबाबत सर्वसामान्य शिवसेना कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्षाच्या सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या जिल्ह्यातील मतदारसंघांतील परिस्थिती जाणून घेतली, तसेच स्वबळावर लढल्यास काय होईल याची चाचपणी केली आहे, तसेच त्यांनी अप्रत्यक्षपणे ऐन वेळी युती झाली नाही तरी स्वबळाची तयारी ठेऊनच कामाला लागा, अशी सूचना जिल्हाप्रमुखांना केली आहे. त्यानुसार साताऱ्यात मात्र, वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वाई, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, पाटण, फलटण आणि माण- खटाव हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. आता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. "मेगा भरती'त अनेक दिग्गज नेते मंडळी भाजपमध्ये गेली आहेत. त्यामुळे भाजप यावेळेस जिल्ह्यातील निम्म्या मतदारसंघांवर दावा सांगण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सूचनेमुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या हक्काच्या मतदारसंघांत उमेदवारांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

यामध्ये वाईतून पुरुषोत्तम जाधव, कोरेगावातून रणजितसिंह भोसले, माणमधून शेखर गोरे, पाटणला विद्यमान आमदार शंभूराज देसाई, फलटण बाबूराव माने, अमोल आवळे, कऱ्हाड उत्तर पतंगराव माने, सुनील पाटील, भानुदास पोळ, कऱ्हाड दक्षिणमधून नितीन काशीद, साताऱ्यातून एस. एस. पार्टे, एकनाथ ओंबळे यांचा समावेश आहे. यासोबत भाजपच्या इच्छुकांनीही तयारी सुरू केली आहे. या सर्वांच्या संपर्क मोहिमेमुळे युती तुटल्यास भाजप सेनेचे उमेदवार एकमेकांसमोर पाहायला मिळणार आहेत. या सर्व इच्छुकांसोबत पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख व कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे- पाटील, तसेच सर्व जिल्हाप्रमुख प्रत्येक मतदारसंघात संपर्क मोहीम राबवत आहेत. 
 

जिल्ह्यात शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची बांधणी पूर्ण केली आहे. प्रत्येक गावात वॉर्डनिहाय एक शाखाप्रमुख आणि शाखा संघटिका नेमून पूर्णपणे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे जाळे विनले आहे. ही तळागाळातून झालेली पक्ष बांधणी युती तुटल्यास विधानसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवाराची ताकद होणार आहे. 
- चंद्रकांत जाधव, जिल्हाप्रमुख, माण- खटाव मतदारसंघ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Willing Sena activitist in self-preparation for election