प्रेमविवाहानंतर वर्षभरातच पतीने चिरला पत्नीचा गळा

नागेश गायकवाड
Sunday, 27 September 2020

अवघ्या वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केल्यावर चारित्र्याचा संशयावरून पत्नीचा तीन परप्रांतीय साथीदारांसह निर्घृण खून केल्याप्रकरणी आज आटपाडी पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्रांना जेरबंद केले.

आटपाडी (जि. सांगली) ः अवघ्या वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केल्यावर चारित्र्याचा संशयावरून पत्नीचा तीन परप्रांतीय साथीदारांसह निर्घृण खून केल्याप्रकरणी आज आटपाडी पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्रांना जेरबंद केले. सायली चव्हाण (वय 20) असे मृत विवाहितेचे नाव आहे. 

येथील सोनारसिद्धनगरात हा प्रकार घडला. पोलिसांनी पती अक्षय चव्हाण (22), सेंट्रिंग कामासाठी म्हणून आटपाडीत स्थायिक असलेले त्याचे परप्रांतीय साथीदार रणजित ऊर्फ शिवा लालसिंग (20, रा. साठेनगर, आटपाडी, मूळ गाव बलना, उत्तर प्रदेश), अंकितकुमार विजय पालसिंह (सध्या रा. बालटे वस्ती, मूळ गाव रामगड, उत्तर प्रदेश) आणि अन्य एका अल्पवयीन संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. माहेरच्या मंडळींनी पत्नीचा खून केल्याचा पतीचा बनाव पोलिसांनी तासाभरात उघड केला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः वर्षभरापूर्वीच कुटुंबीयांचा विरोध पत्करून सायली व अक्षय यांनी प्रेमविवाह केला होता. अक्षयला आधीपासूनच दारूचे व्यसन होते. विवाहानंतर सायलीच्या ते लक्षात येताच तिने अक्षयने दारू सोडावी, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यातून त्यांच्यात वाद सुरू झाला. अक्षय सेंट्रिंग बांधकामाची कामे करायचा. त्यातून परप्रांतीय मजुरांबरोबर त्याची उठबस होती. मद्यपींच्या कोंडाळ्यात अडकलेल्या अक्षयचे व्यसन वाढतच होते व कुटुंबात कलह वाढत होता. अलीकडे अक्षयने पत्नी सायलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाणही सुरू केली होती. 

आज पहाटे त्यांच्यात वादावादी झाली. रागात त्याने धारदार शस्त्राने वार केला. तोंड दाबून तिला न्हाणीघरात नेले. तेथे आधीपासूनच अक्षयचे अन्य तीन मित्र होते. त्यांनीही तिच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार केले. गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह पडला होता. सकाळी माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी त्याने माहेरच्यांनी पत्नीचा खून केल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करीत अवघ्या दीड तासात सारा छडा लावला आणि अक्षय व त्याच्या तीन साथीदारांनाही ताब्यात घेतले. 

अपयशी प्रेमविवाह... 
सायलीचे मूळ गाव सांगोला तालुक्‍यातील बलवडी. वडिलांच्या दुर्दैवी निधनानंतर ती मामांकडे शिकायला आली. आटपाडीत शिकत असताना ती अक्षयच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. दोघांनी कुटुंबाच्या विरोधाला सामोरे जात विवाह केला. मात्र, वर्षभरात ज्याच्यासाठी कुटुंबीयांना सोडले, त्यानेच गळा चिरल्याने सायलीला जीव गमवावा लागला. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within a year after the love marriage, the husband killed wife