सांगली : सुरक्षेअभावी जिल्ह्यातील एटीएम ‘टार्गेट’वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ATM

सांगली : सुरक्षेअभावी जिल्ह्यातील एटीएम ‘टार्गेट’वर

सांगली - जिल्ह्यातील शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत बँकांनी शाखांबरोबर ‘एटीएम’चे जाळे पसरवले आहे. लाखो रुपये भरणा होत असलेल्या एटीएम केंद्रामुळे ग्राहकांची सोय होते. परंतु, लाखो रुपये साठवून ठेवणाऱ्या या एटीएमची सुरक्षा मात्र कवडीमोलाची ठरली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चोरट्यांनी ‘एटीएम’ फोडण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील शेकडो एटीएमची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी होऊन त्यांना तत्काळ पैसे काढता यावेत यासाठी सर्वच बँकांच्या शाखांनी ‘एनी टाईम मनी’ अर्थात एटीएम केंद्रे सुरू केली. सुरुवातीला बँकेच्या शाखेबाहेरच एटीएम असायचे. परंतु, सध्या ग्राहकांची गरज ओळखून एटीएमचे जाळे शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत विस्तारले गेले. सुरुवातीला एटीएम केंद्रामध्ये सुरक्षारक्षक रात्रपाळीला तैनात असायचे. परंतु, सध्या बऱ्याच एटीएममधील चित्र बदलले आहे. बँकांच्या शाखाबाहेर असलेल्या एटीएममध्येच रक्षक असतो. इतरत्र असलेले ‘एटीएम’ केवळ सीसीटीव्हीच्या भरवशावर सुरू आहेत. इथली सुरक्षा ‘रामभरोसे’च म्हणावी लागेल.

एटीएम मशिनमध्ये एकावेळी २५ लाखांहून अधिक रक्कम भरून ठेवली जाते. चार माणसे सहजपणे उचलतील अशा आकाराची मशिन्स सध्या आहेत. एटीएममध्ये सुरक्षारक्षक नसल्याचे पाहून महिन्यापूर्वी आरग (ता. मिरज) येथील एटीएम जेसीबीने फोडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. वाटेत जेसीबीमधून मशिन पडल्यामुळे २४ लाखांची रोकड वाचली. त्यानंतर काल पहाटे शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे चोरट्याने दरोडा टाकून २२ लाख ३४ हजारांची रोकड असलेले मशिनच पळवून नेले. तसेच यापूर्वीही जिल्ह्यात काही ठिकाणी एटीएम मशिन फोडण्याचे प्रयत्न झालेत. त्यामुळे सुरक्षा रक्षक नसलेले एटीएम चोरट्यांच्या ‘टार्गेट’ वर असल्याचे दिसून येते.

३०० हून अधिक एटीएम :

जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बँकांची एटीएम केंद्रे शहरी व ग्रामीण भागात आहेत. त्यांची संख्या ३०० हून अधिक असल्याची माहिती आहे. त्यामध्ये लाखो रुपयांची रोकड दररोज असते. परंतु, सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.

पोलिसांच्या सूचनांचा विसर...

बँकांच्या एटीएममध्ये लाखो रुपये रोकड असल्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी प्रत्येक एटीएममध्ये आत व बाहेर ‘सीसीटीव्ही’ बसवावेत. तसेच सुरक्षारक्षक तैनात करावा, अशी सूचना प्रत्येक बँक प्रशासनाला पोलिसांनी यापूर्वी केली आहे. परंतु, सुरक्षारक्षक तैनात करण्याकडे राजरोस दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

आरबीआयची मानके...

आरबीआयने एटीएम केंद्र स्थापन करताना काही मानके ठरवून दिली आहेत. त्यामध्ये आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक, सायरन यंत्रणा, फ्लॅश लाईटस्‌ आदी प्रमुख मानकांची पूर्तता करण्यास सांगितले आहे. सायरन व फ्लॅश लाईटस्‌ला अनेक ठिकाणी फाटा दिल्याचे दिसून येते.

Web Title: Without Security Atm On Targat In Sangli District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top