नोकरीच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीची महिलेची तक्रार

शांताराम पाटील
Friday, 9 October 2020

 शासकीय आरोग्य विभागात नोकरी देण्याच्या आमिषाने कामेरी (ता. वाळवा) येथील डॉक्‍टरने करंजवडे (ता. वाळवा, जि. सांगली ) येथील महिलेची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद कुरळप पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

कुरळप : शासकीय आरोग्य विभागात नोकरी देण्याच्या आमिषाने कामेरी (ता. वाळवा) येथील डॉक्‍टरने करंजवडे (ता. वाळवा, जि. सांगली ) येथील महिलेची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद कुरळप पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

करंजवडे येथील विश्वनाथ राजाराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, "माझी पत्नी सौ.भारती पवार हिचे बी. फार्मसी चे शिक्षण पुणे येथे पूर्ण झाले आहे. आमच्या कुटुंबीयांनी तिच्या नोकरीसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.

प्रशांत राजाराम भोसले यांच्या माध्यमातून कामेरी येथील डॉ. अमोल महादेव अजमाने व त्याचे वडील डॉ. महादेव शिवलिंग अजमाने यांच्याशी संपर्क झाला. त्यावेळी डॉ. अमोल अजमाने याने तुम्हाला शासकीय आरोग्य विभागात कंपाउंडर पदाची नोकरी लावतो. त्याकरता एक लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

नोकरी मिळणार असल्याने व त्याची खात्री प्रशांत भोसले यांच्याकडून देण्यात आल्याने डॉ. अजमाने याला एक लाख रुपये दिले. तीन वर्ष होऊन देखील डॉ. अजमाने याच्याकडून नोकरीचे काम झाले नाही. त्यानंतर मी व माझ्या कुटुंबीयांनी डॉ. अजमाने याच्याकडे पैसे परत मागितले. 2017 सालापासून ते आजपर्यंत तो आज देतो उद्या देतो असे सांगतो आहे.

दरम्यानच्या काळात वडील डॉ. महादेव अजमाने यांनी माझ्या मुलाने पैसे दिले नाही, तर मी तुम्हाला पैसे देतो अशी वचनचिठ्ठी लिहून दिली आहे. त्यांनीही अद्याप पैसे परत केलेले नाहीत. आर्थिक फसवणुकीने सध्या माझी पत्नी मानसिक तणावाखाली असून आमच्या कुटुंबा मध्ये चिंतेचे वातावरण आहे.'' सहाय्यक पोलिस निरिक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार कोकितकर तपास करीत आहेत. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman complains of financial fraud for job