धारावीतून आलेल्या महिलेसह  वाळव्यातील तरुणाला कोरोना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

सांगली- मुंबईतील धारावी झोपडपट्टीतून आलेल्या आणि इस्लामपूर येथे ताब्यात घेऊन अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या 21 जणांपैकी 37 वर्षाची एक महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे.

सांगली- मुंबईतील धारावी झोपडपट्टीतून आलेल्या आणि इस्लामपूर येथे ताब्यात घेऊन अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या 21 जणांपैकी 37 वर्षाची एक महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे. 21 पैकी 14 जणांचे अहवाल पहिल्या टप्प्यात हाती आले असून त्यातील 13 जण निगेटिव्ह आहेत. याशिवाय, पुणे येथून वाळवा गावात आलेला 22 वर्षाचा तरूण कोरोना बाधित झाला आहे. बाधितांची संख्या दोनने वाढली असून आता एकूण 35 रुग्णांवर मिरजेतील कोरोना इस्पितळात उपचार सुरु आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी ही माहिती दिली. 

दरम्यान, सांगलीतील रेव्हेन्यू कॉलनीतील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला असून ती आता कोरोना मुक्त झाली आहे. माधवनगर रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून तो आता कोरोनामुक्त झाला आहे, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला क्षयरोगासह अन्य आजार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. बलवडी येथील 55 वर्षाचा पुरुष आणि शिराळा येथील 50 वर्षाचा पुरुष हे दोघेही कोरोनामुक्त झाले असले तरी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु ठेवण्यात आले आहेत. यापैकी शिराळ्यातील रुग्णाला ऑक्‍सिजनवर ठेवण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With a woman from Dharavi Corona to the young man in the desert