शेती अवजारांच्या लाकडी प्रतिकृतीचं झालं संग्रहालय, छंद बनला व्यवसाय 

SHAILESH PETKAR
Friday, 24 July 2020

कोरोनाचे संकट मोठे आहेच, मात्र त्याने मोडून चालणार नाही. जगण्यासाठी नवनवे मार्ग शोधावे लागतील. त्यासाठी "सकाळ'ने पुढाकार घेतला आणि अशा नवा मार्ग शोधणाऱ्यांना वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरु केला. अशा काही धडपड्या लोकांची ओळख यानिमित्ताने व्हावी आणि या लढाईला बळ मिळावे, हाच त्यामागचा उद्देश. 

सांगली ः शेती पारंपारिक व्यवसाय. कोरोना बंद काळात शेतीची कामे बंद राहिली. या काळात करावे काय, हा प्रश्‍न माझ्यासमोर उभा होता. लुप्त पावत चाललेल्या लाकडी शेती अवजारांची प्रतिकृती तयार करण्याची मला पूर्वीपासून आवड होती.

लाकडी बाजल्याने सुरवात झाली आणि काही महिन्यात वस्तूंनी घर भरून ेगेले. छोटेखानी संग्राहलय तयार झाले. पंचक्रोशीत चर्चा सुरु झाली. लोक भेट देताहेत. अवजारे, बैलगाडी, बाजल्याला मागणी सुरु झाली. छंदातून धंदा सुरु झाला... मिरजेतील शेतकरी ज्योतीबा रुईकर "सकाळ'शी बोलताना सांगत होते. 

आमची मिरजेत आठ एकर शेती आहे. मी शेतात काम करतांना अवजारे दुरूस्ती, बैलगाडी दुरूस्ती हे स्वतःच करायचो. यातूनच लुप्त होत चाललेली लाकडी अवजारे बनविण्याचा छंद लागला. लाकूड जमवले. यंत्रसामुग्रीही उपलब्ध केली. घरीच अवजारांची प्रतिकृती तयार करण्यास सुरूवात केली. कोळप, फण, कुळण, कुरू, चाडं, भोड, बैल झुपण्यासाठी जू तयार केले. हळूहळू मी त्याच रमू लागलो. लॉकडाउनचा काळ कसा निघून गेला समजलेच नाही.

पेरणी अवजारांची प्रकृती तयार केली. लाकडी बैलगाडीची प्रतिकृतीही साकारली. बारा लोक बसतील असे बाजले आहे. त्याला मागणी वाढली आहे. शेतीची जुनी आवजारे नव्या पिढीला माहित व्हावीत, हाच त्या मागचा उद्देश. अवजारे, बैलगाडी यांचा प्रतिकृती पाहण्यासाठी लोक येवू येवू लागले आहेत. आता घरात या वस्तू ठेवून घराची शोभा वाढविण्यासाठी आता ऑर्डरही येवू लागल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wooden replica of agricultural implements became a museum, a hobby became a business