'कला' शब्दाला डिजिटली माध्यमातून सजवणार कलाकार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

'कला' हा शब्द त्यांनी वर्षभर वेगवेगळ्या पध्दतीने 'डिजिटली' म्हणजे आयपॅडच्या माध्यमातून सजवला आहे.

सांगली : देवनागरीमध्ये एकच शब्द किती प्रकारे लिहिता येईल असे कुणाला विचारले तर नक्की सांगता येणार नाही. पण, तो सलग वर्षभर वेगवेगळ्या पध्दतीने सुलेखन म्हणून, दिन विशेष म्हणून लिहला तर... येथील सुलेखनकार, कलाशिक्षक प्रमोद खंजिरे यांनी गेले वर्षभर हा प्रयोग केला आहे. 'कला' हा शब्द त्यांनी वर्षभर वेगवेगळ्या पध्दतीने 'डिजिटली' म्हणजे आयपॅडच्या माध्यमातून सजवला आहे. त्यांची ही शब्दाची कलाकारी लई भारी ठरली आहे. 

प्रमोद खंजिरे हे राजमती गर्ल्स हायस्कूलमध्ये कलाशिक्षक. दोन वर्षापुर्वी सुविचारांचे सुलेखन केले. ते सोशल मिडियातून व्हायरल झाले. कौतुक झाले. गेल्यावर्षी त्यांनी एकच शब्द वेगवेगळ्या पध्दतीने सुलेखन करण्याचे ठरवले. त्यासाठी 'कला' शब्द निवडला. 1 जानेवारीला प्रारंभ झाला. सुलेखन म्हणून वेगवेगळ्या पध्दतीने त्यांनी कला शब्द तयार केला. दिन विशेष 'कला' शब्दातून साकारण्याची कल्पनाही त्यांनी वास्तवात आली. 

हेही वाचा -  ‘आता नाही, तर पुन्हा नाही’ ; सोशल मीडियातून स्वस्तात मस्त होतोय प्रचार -

खंजिरे सांगतात, 'सुविचारांची मालिका कागदावर तयार करत होतो. कागद, रंग, ब्रश असा खर्च व्हायचा. एक सुविचार अंतिम होईपर्यंत कागदही खराब व्हायचे. आता कला शब्द आयपॅडवर करतो. सगळा खर्च वाचतो. रंग आणि ब्रशचे विविध प्रकार त्यावर उपलब्ध असल्याने त्याचा चांगला वापर करतो. आयपॅडवरुन निसर्गातील बाबींचा म्हणजे झाडे, पाने, वेली, फळे यांच्या माध्यमातून कला शब्द सुलेखनमधून तयार केला.'

डिजीटल वापर 

आयपॅडवर डिजिटली तयार केलेला कला शब्द इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्‌सअपच्या माध्यमातून परदेशापर्यंत पोहोचला. परदेशी कलाकारांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात लोक घरीच असल्याने त्यांच्या मनोरंजनासाठी वेगळा प्रयोग केला. कला शब्दातून विविध खेळ, भाज्या, किचनमधील गोष्टी साकारुन आपला वेळ कसा घालवता येईल याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे खंजिरे सांगतात.

हेही वाचा - एकाच दिवसात नशीब चमकलं ; मच्छीमार झाला लखपती, बंपर माशाची लागली लॉटरी -

सुमारे दीडशेहून अधिक सुलेखन केलेला कला शब्द तयार आहे. त्यामुळे हा उपक्रम पाचशे दिवसांपर्यंत चालू राहील. असा एकच शब्द वेगवेगळ्या पध्दतीने सुलेखन करण्याचा सर्व भाषांतील पहिलाच प्रयोग असावा, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: word kala to promote and attorn one person in digital platform in sangli