esakal | 400 किलोमीटरच्या रस्त्यांचे काम पुन्हा सुरू; पण झालाय महा"चिखल' 
sakal

बोलून बातमी शोधा

 Work on 400 kilometers of roads resumed; But it's too "mud"

एकूण दोनशे किलोमीटरहून अधिक मार्ग "चिखल रस्ता' झाला आहे. त्यावर अपघात होताहेत. पावसाळ्याआधी हे काम पूर्णत्वाला जाणे शक्‍य नाही, हे आता स्पष्ट आहे.

400 किलोमीटरच्या रस्त्यांचे काम पुन्हा सुरू; पण झालाय महा"चिखल' 

sakal_logo
By
संकलन :संतोष कणसे, गोरख चव्हाण, बादल सर्जे, दिलीप कोळी

सांगली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्गासह राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गांचे सुमारे 400 किलोमीटर अंतराचे काम सुरू आहे. लॉकडाउनमुळे दोन महिने काम ठप्प होते, ते पुन्हा सुरू केले आहे. आता पावसाने त्यात खंड पडणार आहे. यापैकी बहुतांश रस्ता उकरून टाकला असून, त्यावर मुरुम, माती टाकली आहे. त्याचा चिखल झाला आहे. एकूण दोनशे किलोमीटरहून अधिक मार्ग "चिखल रस्ता' झाला आहे. त्यावर अपघात होताहेत. पावसाळ्याआधी हे काम पूर्णत्वाला जाणे शक्‍य नाही, हे आता स्पष्ट आहे. अशावेळी वाहनधारकांनी सावधगिरी बाळगणे, शक्‍यतो पर्यायी मार्गाने जाणे हाच उपाय आहे. 

गुहागर-विजापूरमार्ग : कडेगाव; फक्त चिखलमार्ग 

कडेगाव ः लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरु झाले असले तरी ते पूर्णत्वास जाऊ शकले नाही. त्यामुळे जेथे काम अपूर्ण राहिले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे तेथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याचा धोका असल्याने वाहनधारकांना येथून आपला जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम 31 डिसेंबर 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी होता, परंतु या कालावधीत सदर महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या कामाला एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे येथे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथे चिखलात घसरगुंडी झाल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याचा धोका वाढला, तर महामार्गावर जेथे जेथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तेथे अनेकजण मोटारसायकलवरून घसरून पडून अपघात होत आहेत. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गाचे काम गतीने पूर्ण करावे व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी आता वाहनधारक व नागरिकांतून होत आहे. 

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग ः जत; पाऊस पडला की घसरगुंडी 

जत : लोकडाउनमुळे गुहागर-विजापूर मार्गाचे काम ठप्प झाले आहे. जत तालुक्‍यातून हा रस्ता 45 किमीचा होणार आहे. त्यामध्ये 20 किमीपर्यंतचा रस्ता हा पूर्ण झाला आहे. राहिलेला रस्त्यावर सर्वत्र मुरमुर पडला आहे. काल झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ता समजला जाणारा गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग अपघाताला निमंत्रण देत आहे. मातीचा लेअर असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून दलदल तयार झाले आहे, तर अक्षरशः पायपीट करणाऱ्या लोकांना वाट शोधावी लागतेय. दुचाकी वाहने चिखलात स्लीप होऊन रस्त्यावर कोसळण्याचे प्रमाण अधिक असून, मोठ्या दुर्घटना वाव मिळत आहे. पावसाळ्यापूर्वी व लॉकडाउन काळात शहरातील या राष्ट्रीय महामार्गावरील कामाला गती देण्यासाठी आमदारांसह प्रमुख महामार्गाच्या अधिकारी, ठेकेदारांनी बैठकही घेतली होती. मात्र, ठेकेदाराचे कर्नाटकात काम सुरू असल्याने सर्व मजूर तेथे हलविले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम खोळंबले आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर दलदल होणार नाही, गाड्या घसरून अपघात होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे होते. मात्र, शहरात राष्ट्रीय महामार्गासह बाजार पेठेतील रस्तेही चिखलाने माखले असून, अपघाताला आमंत्रण देत आहेत. 

अपघातांचा धोका वाढला 

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम तालुक्‍यात सध्या सुरू आहे. तालुक्‍यातून अलकुड (एम्‌) येथून हा राष्ट्रीय महामार्गाचा प्रवेश सुरू होतो. तो राष्ट्रीय महामार्ग विठ्ठलवाडी याठिकाणी तालुक्‍याच्या हद्दीपर्यंत संपतो. तेथून पुढे सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. लॉकडाउनमुळे या रस्त्यांचे काम रखडले आहे. तालुक्‍यातील अलकुड (एम), शिवगंगा,जॉलीबोर्ड शिरढोण, नरसिंहगाव, कवठेमहांकाळ कॉर्नर याठिकाणी तसेच पुढेही काही गावांत रस्त्याचे काम सुरू असल्याने मुरमीकरण केले आहे; मात्र सोमवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर प्रचंड चिखल झाला आहे. काही प्रमाणात रस्त्याचे काम सुरू असल्याने मुरमीकरण केले आहे. त्यामुळे सध्या मॉन्सून सुरू झाल्याने मुरमीकरण केलेल्या रस्त्यावर पाणी साठवून रस्ता काही प्रमाणात चिखलमय होतो. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागते. काही दरम्यान रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाल्याने लवकरच हा महामार्ग सुरू होईल, असे चित्र आहे. 

विजापूर - गुहागर मार्ग : खानापूर; रेणावी ते पळशी सर्कसच

विटा : विटा शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर राज्यमार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. सध्या पडत असणाऱ्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साठून राहिला आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या राज्यमार्गावर रेणावी ते रेवणगाव घाटात रस्त्याचे ठेकेदाराने अर्धवट काम केले आहे. पळशी (ता. खानापूर) येथून पुढे काम बंद अवस्थेत आहे. काही ठिकाणी रस्त्याकडेला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीमुळे वादाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची ठिकठिकाणी कामे ठप्प आहेत. या शेतकऱ्यांचा वाद मिटवून रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत, अशी वाहनधारकांची मागणी आहे. 

loading image