esakal | ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करा : हॉकीपटू धनराज पिल्ले
sakal

बोलून बातमी शोधा

ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करा : हॉकीपटू धनराज पिल्ले

हॉकीमुळे आयुष्यात मी खूप काही शिकलो आहे. मी देशासाठी खेळत असताना मला मिळालेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार माझ्या आईने स्वीकारला. हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस ठरला आहे. साताऱ्यातून उत्तम हॉकी खेळाडू घडत आहेत, हे ऐकून आनंद वाटतो.
धनराज पिल्ले, हॉकीपटू 

ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करा : हॉकीपटू धनराज पिल्ले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा ः आई-वडील, प्रशिक्षक तसेच खेळावर नितांत प्रेम करा तसेच उचित ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा, असा मौलिक सल्ला पद्मश्री धनराज पिल्ले यांनी नवोदित खेळाडूंना दिला. 
हॉकी सातारा अकादमी व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सैनिक स्कूलच्या सभागृहात मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिनिमित्त आयोजिलेल्या क्रीडा दिन समारंभात पिल्ले बोलत होते. व्यासपीठावर हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मनीष आनंद, सचिव मनोज भोरे, सहसचिव पराग ओझा, सैनिक स्कूलचे उपप्राचार्य विंग कमांडर लक्ष्मीकांत, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, हॉकी सातारा अकादमीचे खजिनदार आँचल घोरपडे, दीपक पाटील, शाम गिते आदी उपस्थित होते. 
पिल्ले म्हणाले, ""मेजर ध्यानचंद हे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला, याचा मला अभिमान आहे. हॉकी माझ्या रक्तात भिनली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे माझे संपूर्ण कुटुंब हॉकी खेळत होते. माझ्या जडघडणीत कुटुंबांचा खूप मोठा वाटा आहे. खेळाडूंनी उचित ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी. आई-वडील, प्रशिक्षक तसेच खेळावर नितांत प्रेम करा. खेळामध्ये राजकारण, आवड-निवड, न्यूनगंड या गोष्टींना फारसे महत्त्व देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता पुढे चालत राहा. यावेळी विंग कमांडर लक्ष्मीकांत, मनोज भोरे, सागर कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. 
प्रारंभी पिल्ले यांच्या हस्ते हॉकी महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्‌घाटन झाले. तसेच गुणवंत क्रीडा शिक्षक, हॉकी या खेळामधील विशेष प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आँचल घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. सादिक अली बागवान यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. 

loading image
go to top