दोनशेंवर कुटुंबातून प्लास्टीक कचरा उठावाचे काम 

The work of picking up plastic waste from two hundred families
The work of picking up plastic waste from two hundred families

सांगली : सांगली आणि मिरज शहरातील सुमारे दोनशेंवर कुटुंबातून प्लास्टीक कचरा उठावाचे काम सेवाभावी वृत्तीने सध्या होत आहे. या कामी निसर्ग संवाद आणि वेस्टकार्ट या संस्थांच्या सुमारे चाळीसहून अधिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून प्लास्टिक संकलन करून ते पुनर्निर्मितीसाठी ते पाठवणे असं सध्याच्या या कामाचं स्वरूप आहे. 

शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असताना या समस्येवर आपापल्या परीने काहीएक मार्ग काढण्याचा प्रयत्न सारे करीत आहे. समाजातील हा सकारात्मक बदल काही चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी उपकारक असाच आहे. रस्तोरस्ती प्लास्टिक पडल्याने शहर गलिच्छ दिसते. ते प्लास्टिक जनावरे खातात आणि जीवाला मुकतात. कचरा कुंड्यामध्ये हे प्लास्टिक पेटवून दिल्याने प्रदूषणाची समस्या बिकट होते. कचरा वेचक महिलांकडून हे प्लास्टिक उचलले जात नाही. त्यामुळे किमान प्लास्टिक उचलले तर बाकीचा घन कचरा वेचक महिलांकडून पुनर्वापरासाठी जाईल अशी आशा आहे. 

या उपक्रमात आपल्या घरातील, परिसरातील सर्व प्लास्टिक एकत्र करून तो एका पोत्यात साठवून संस्थेची गाडी महिन्यातून एकदा घरी आल्यानंतर द्यायचे. पुढे एकत्रित सारा कचरा पुनर्निर्मितीसाठी पाठवण्यात येतो. सर्व प्रकारचे कोरडे प्लास्टिक स्वीकारताना काच, कागद, पुठ्ठे, रबर, चप्पल आदी गोष्टी मात्र कुटुबांने एकत्र साठवून कचरा वेचक महिलांकडे द्याव्यात अशी अपेक्षा आहे. प्लास्टिकमध्ये चॉकलेट-बिस्कीटच्या रॅपरपासून सारे काही असू शकते. 

या कामी वासंती लेले, हिमांशू लेले, संजय कट्टी, महेश कुलकर्णी, राजेंद्र जोशी, अर्चना लेले आदींसह अनेकांचा सहभाग आहे. काही ज्येष्ठ नागरिकांचे गटही या उपक्रमाच्या प्रचारासाठी वेळ देतात. वर्षभरापूर्वी त्यांनी या उपक्रमाला सुरवात केली, मात्र कोरोनाच्या आपत्तीने त्यात खंड पडला. 

सुरवातीच्या टप्प्यात सव्वाशेवर कुटुंबांनी प्रतिसाद दिला होता. गेल्या महिन्याभरात दोनशे कुटुंबांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. आता एक एक गल्ली घेत तिथे गल्लीप्रमुुख नेमून त्यांच्याकडे हा कचरा साठवून ठेवण्यात येणार आहे. हा व्याप आणखी वाढवत शहरातील काही प्रभाग प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे. पूर्वी शहरातील सूर्या इंडस्ट्रीजकडे आम्ही हा कचरा सोपवत होतो. आता हा कचरा पुण्याला पाठवला जाईल. त्यासाठी बांधकाम व्यावसायिक चिदंबर कोटीभास्कर यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. 

घरातूनच प्लास्टिक वेगळे केले जावे आणि ते कुंडीत न जाता थेट पुनर्वापरासाठी इंडस्ट्रीत गेले पाहिजे असा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कचरा वेचकांकडून सर्व प्लास्टिक उचलले जात नाही. लोकांचा प्रतिसाद पाहून आम्ही यातील त्रुटी दूर करू. नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा.'' 
विजय गुदले, निसर्ग संवाद ग्रुप


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com