पोटासाठी सुरू झालीय सेंट्रींगची ठक-ठक! 

पोपट पाटील
Monday, 7 September 2020

लॉकडाऊनच्या काळातसुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी सेंट्रींग मजुरांनी स्वतःची काळजी घेत कामाची सुरुवात केली आहे. 

इस्लामपूर (जि . सांगली) : पाच महिने झाले तरी कोरोनाचा विळखा सुटण्याचे नाव घेत नाही. पण, पोटासाठी काम तरी करायलाच हवे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातसुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी सेंट्रींग मजुरांनी स्वतःची काळजी घेत कामाची सुरुवात केली आहे. 

मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस त्याचा प्रसार वाढतच चालला आहे. सुरवातीच्या काळात प्रशासन, सामजिक संस्था यांनी आपल्या परीने काम करणाऱ्या मजुरांना अन्नधान्य, जेवणाची थाळी अशी अनेक प्रकारे मदत केली. पहिल्या लॉकडाऊनच्या कालावधीत ही मदत गरीब नागरिकांना महिनाभर सुरू होती. त्यानंतर हळूहळू कामकाज सुरू झाल्याने रोजंदारी करणाऱ्या नागरिकांचा पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागत गेला. अन्नधान्य मदत, जेवणाची थाळी बंद झाली. 

मात्र आता ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाने आपला फास आणखी अवळायला सुरवात केली आहे. दिसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणखी काही दिवस सुरू ठेऊन कोरोनाचा अटकाव करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.

दररोज रोजंदारी करणाऱ्या मजुरांसमोर काम केल्याशिवाय संपूर्ण कुटुंबाची पोटाची खळगी कशी भरणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा लॉकडाऊन परवडणारा नसल्याने त्यांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेत कामकाज सुरू केलेले दिसत आहे. यामुळे इतरवेळी शहरात शांतता पसरली असली तरी, काहीठिकाणी ठक- ठक असा सेंटरिंगच्या कामाचा आवाज ऐकू येत आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work started by the workers taking care of social distance