सलगरेत राज्यमार्गावर काम संथगतीने 

अनिल पाटील
Wednesday, 24 February 2021

सलगरे ते मिरज व सलगरे-कवठेमहांकाळ मार्गावर सध्या राज्यमार्गाचे काम निकृष्ट व संथगतीने सुरू असल्याने वाहनधारक, प्रवाशांबरोबरच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या द्राक्षबागा व इतर पिकांना फटका बसत आहे. कवठेमहांकाळ मार्गावरील दुकानदारांच्या व्यापारावरही या कामाचा परिणाम होत आहे.

सलगरे : सलगरे ते मिरज व सलगरे-कवठेमहांकाळ मार्गावर सध्या राज्यमार्गाचे काम निकृष्ट व संथगतीने सुरू असल्याने वाहनधारक, प्रवाशांबरोबरच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या द्राक्षबागा व इतर पिकांना फटका बसत आहे. कवठेमहांकाळ मार्गावरील दुकानदारांच्या व्यापारावरही या कामाचा परिणाम होत आहे. तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. 

राज्यमार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण तसेच लहान मोठ्या पुलांची कामे सुरू आहेत. पण सुरू असलेल्या कामात संबंधित ठेकेदारांचे व कामगारांचे दुर्लक्ष होत असल्याने लहान-मोठे खड्डे पडणे, दोन्ही बाजूला रस्ता खोदून खडी पसरल्याने ऊसगाड्या अडकून वाहतूक खोळंबून रहात आहे. गटारीचे निकृष्ट बांधकाम व तुटलेली चिरा पडलेली झाकणे बसविण्यात येत आहेत.

 या मार्गावरील एरंडोली पुलावरील रस्ता तसेच मल्लेवाडी जवळील आड ओढ्यापासून टाकळीपर्यंत रस्त्यावर लहान, मोठी खडी पसरल्याने दुचाकी, चारचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. तसेच ओव्हरलोड धावणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर पाणी न मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अशा कामांमुळे महामार्गावरील सलगरे, बेळंकी, शिपूर, एरंडोली, टाकळी या गावांतील ग्रामस्थ, वाहनधारकांमध्ये महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. महामार्गाच्या कामांवर नियंत्रण व गुणवत्ता तपासणीसाठी नेमलेले अधिकारीही मूग गिळून गप्प का आहेत, असा सवाल केला जात आहे. 

द्राक्षबागांनाही फटका 
सलगरे-मिरज व कवठेमहांकाळ रस्त्यालगत असणाऱ्या द्राक्षबागांच्या पानावर व निर्यातक्षम द्राक्षच्या घडांवरती धुळीचा थर जमा होत असल्याने व्यापाऱ्यांकडून कमी दराने द्राक्षे खरेदी करीत आहेत. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणांमुळे भीतीच्या छायेखाली असणारा बागायतदार शेतकरी या नव्या समस्येने हैराण झाला आहे. 

"महामार्गावरील पुलांची उंची वाढविण्याची गरज' 
अवकाळी पावसाने मिरज पूर्व भागातील पिके, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच ओढ्या-नाल्यांतून व सलगरे-मिरज, कवठेमहांकाळ या मार्गावर कमी उंचीच्या पुलांवरून पाणी वाहत होते. मल्लेवाडी येथील पुलावरून एक महिला वाहून गेल्याची घटना घडली. असे असूनही बांधकाम विभागाकडून या मार्गावरील पुलांची उंची वाढविण्यासंदर्भात कोणतीच हालचाल झाली नाही. आहे त्याच उंचीवर पुलांचे फक्त रुंदीकरण करण्यात येत आहे. परंतु पुन्हा जोरदार पाऊस पडल्यास वाहतुकीला व ग्रामस्थांना त्रास होणार असून पुलांची उंची वाढविण्याची गरज आहे. 

...तर काम बंद करू 
मिरज पूर्व भागातील सलगरे गावांकडे दुचाकी, चारचाकीने येणाऱ्यांची संख्या दुग्धोद्योग व इतर खरेदी करण्यासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढल्याने या राज्यमार्गाचे काम चांगल्या दर्जाचे करावे व लवकर पूर्ण करण्यात यावे. निकृष्ट काम होत असल्यास काम बंद करण्यात येईल, असा इशारा सलगरे ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजीराव पाटील व उपसरपंच सुरेश कोळेकर यांनी दिला आहे. 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on the state highway in a row is slow