
पलूस : विजापूर-गुहागर या मार्गावरील तासगाव-कऱ्हाड या महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना त्रास होत आहे. खराब रस्त्यामुळे या मार्गावर लहान-मोठे अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग समितिने रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
विजापूर-गुहागर या महामार्गाचे काम दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, हे काम ताकारीपासून ते तासगावपर्यंत रखडले आहे. ताकारी, घोगाव, कुंडल, पलूस, सांडगेवाडी, बांबवडे, येळावी येथील काही शेतकरी रस्त्याच्या हद्दीवरून व नुकसानभरपाईसाठी न्यायालयात गेले. या दरम्यान, महामार्ग समितीनेही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. संबंधित ठेकेदारही बेफिकीर होते.
न्यायालयाचा निकाल येईपर्यंत ताकारीपासून ते तासगावपर्यंत महामार्गाचे काम रखडले. रस्त्यावर झालेल्या खोदाईमुळे, पुलांच्या अर्धवट कामांमुळे चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना या रस्त्यावर जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. खराब रस्त्यावर अनेक लहान- मोठे अपघात झाले आहेत. काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिक व सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर रस्त्यावर असलेले खड्डे तात्पुरते मुजवले जातात.
आठ दिवसांत हे खड्डे पुन्हा आहे तसे तयार होतात. काही ठिकाणी रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. मात्र, दर्जाहीन कामामुळे रस्त्यावरील डाबर जाऊन खडी पुन्हा उखडली आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्ग समितीचे अजिबात लक्ष नाही. आता या रस्त्याचे काम शसनाच्या उपलब्ध असलेल्या बाजूच्या जागेवरूनच सुरू होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, सध्या तरी हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याचे काम त्वरित सुरू करून, प्रवास सुखकर करावा, अशी मागणी होत आहे.
महामार्ग समितीचे दुर्लक्ष
विजापूर-गुहागर महामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे तसेच, महामार्गावर होणारे अतिक्रमण आणि महामार्गावर होणारे चारचाकी व दुचाकी वाहनांचे पार्किंग याकडे महामार्ग समितीचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पलूस हद्दीत मोठ्या प्रमाणावर पार्किंग होत आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.