
World AIDS Day : जिल्ह्यात एड्स उच्चाटनाच्या वाटेवर...
बेळगाव : एचआयव्ही-एड्सबाधितांचे प्रमाण नियंत्रणाखाली ठेवण्यात आरोग्य विभागाला यश मिळत आहे. 2015-16 मध्ये बाधितांचा सरासरी टक्का दीड होता. मात्र, तीन वर्षांपासून बाधित अर्धा टक्क्यावर आहेत. त्यामुळे रोग नियंत्रणासह उच्चाटनाकडे त्याची वाटचाल सुरू आहे.
आरोग्य विभागाच्या एचआयव्ही-एड्स नियंत्रण विभागातर्फे एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या दरम्यान 1 लाख 24 हजार 25 जणांची एचआयव्ही चाचणी झाली. यांपैकी 733 जणांना एचआयव्ही झाल्याचे निदान झाले. तर या कालावधीत 87 हजार 828 गर्भवती महिलांची एचआयव्ही चाचणी केली असून, पैकी 45 गर्भवती एचआयव्हीबाधित आढळून आल्या आहेत.
जिल्ह्यात 2021-22 मध्ये 1,50,674 जणांची एचआयव्ही चाचणी झाली. त्यांपैकी 912 जणांना एचआयव्ही झाल्याचे निदान झाले आहे. तर यंदा म्हणजे एप्रिल-ऑक्टोबर 2022 दरम्यान केवळ 7 महिन्यांत 733 एचआयव्ही झाले आहेत. 2021-22मध्ये गर्भवती महिलांपैकी 1 लाख 20 हजार जणांची चाचणी झाली.
पैकी 53 गर्भवती एचआयव्हीबाधित आढळून आल्या. तर यंदा ४५ गर्भवती एचआयव्हीबाधित असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
2026-17 मध्ये २,३९४ एचआयव्ही बाधित होते. तर सरासरी टक्केवारी 1.7 होती. 2016-17 मध्ये टक्का परत वाढून 2,159 जणांना बाधा झाली. सरासरी टक्केवारी 1.52 पोचली. 2017-18 मध्ये 2,035 जणांना एचआयव्हीची लागण झाली. त्यामुळे सरासरी टक्केवारी 1.32 होती. तर 2018-19 मध्ये 1,798 जणांना एचआयव्ही लागण झाली. तर सरासरी 1.09 होती.
मात्र, यानंतर बाधितांची संख्या १ टक्केपेक्षा अधिक राहिलेली नाही. ३ वर्षांत म्हणजे 2019-20 मध्ये बांधितांची संख्या कमी होऊन 1,460 वर पोचली. 2020-21 वर्षात एचआयव्ही बाधितांची संख्या ८७२ होती. तर सरासरी टक्केवारी 0.72 होती. 2021-22 मध्ये 912 जणांना एचआयव्ही झाल्याचे पुढे आले असून, सरासरी प्रमाण कमी होऊन 0.60 वर पोचले आहे.
यंदा म्हणजे एप्रिल-ऑक्टोबर 2022 दरम्यान 733 जणांना एचआयव्ही झाला असून, यामुळे बाधितांचा टक्का 0.59 आहे. त्यामुळे मागील आठ वर्षांमध्ये बांधितांची संख्या कमी झाली असून, रोग नियंत्रणाखाली येत आहे.