खासदार महास्वामींनी ‘ही’ दिली ग्वाही 

हुकूम मुलाणी
Friday, 17 January 2020

माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, या भागातील देवस्थानच्या विकासासाठी राज्यसरकारच्या माध्यमातून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. आता यापुढील काळात केंद्राच्या निधीतून या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : सिध्दापूर येथील स्वयंभू मातृलिंग देवस्थानच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.
सिद्धापूर येथील भिमा नदीच्या पात्रात असलेल्या स्वयंभू गणपतीची पूजा पहाटे खासदार डॉ. महास्वामी यांच्या हस्ते झाली. यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, प्रणव परिचारक, सरपंच आश्विनी सोनगे, दयानंद सोनगे, बापूराव चौगुले, संतोष सोनगे, अनिल बिराजदार, जालिंदर व्हनुटगी, ट्रस्टचे अध्यक्ष अप्पासाहेब धु. पाटील, आप्पासाहेब पटवर्धन, विजयकुमार भरमगोंड, अप्पासाहेब चौगुले आदींसह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविक एक दिवसीय यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
पहाटेच्या पूजेनंतर ट्रस्टच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, या भागातील देवस्थानच्या विकासासाठी राज्यसरकारच्या माध्यमातून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. आता यापुढील काळात केंद्राच्या निधीतून या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जेणेकरून या भागात भाविकांची संख्या वाढेल व आलेल्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नानासाहेब मलगोंड व आभार सुरेश पवार यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worship of Swayambhu Ganapati in the river Bhima at Siddapur