शड्डू घुमला 15 वर्षांनी ; तरूणांच्या पुढाकाराने तालीम उभारली

दिग्विजय साळुंखे
Friday, 4 December 2020

आता तब्बल 15 वर्षांनी तरूणाईच्या प्रयत्नाने तालिम उभआरली आहे. शड्डू घुमू लागला आहे. 

बोरगाव : तासगाव तालुक्‍यातील निंबळक बऱ्याच विशेष नावांनी प्रसिद्ध आहे. एकेकाळी या गावात घरटी एक पैलवान होता. काही वर्षात पैलवानकी संपुष्टात आली. उरले ते ते बाहेरगावच्या तालमीत जाऊ लागले. सन 2005-06 मध्ये तालीमच पाडण्यात आली. तेथे मंदिर उभारले. तेथूनच तालिम, कुस्ती व पैलवानाची संगत सुटली. आता तब्बल 15 वर्षांनी तरूणाईच्या प्रयत्नाने तालिम उभआरली आहे. शड्डू घुमू लागला आहे. 

गावातील दोन पिढ्या कुस्तीपासून वंचित राहिल्या होत्या. बोटावर मोजण्याइतके पैलवान उरले होते. ही धोक्‍याची घंटा होती. म्हैशींची जागा जर्सी गायींनी घेतली. जुने पैलवान "तालीम असावी' म्हणून प्रयत्न करीत होते. पण यश येत नसल्याने खंत व्यक्त करीत. सन 2011 पासून तालमीच्या पुनरूज्जीवनासाठी चर्चा होऊ लागली. जागा नव्हती. ना निधी. जुन्या ग्रामपंचायतीशेजारी खासगी पडकी जागा होती. ती तरुणांनी स्वच्छ केली. काही दिवस ती वापरात आणली. तीच जागा जुन्या पैलवानांनी वर्गणी काढून खरेदी करून ग्रामपंचायतीकडे दिली.

हेही वाचा - शिक्षक, पदवीधरच्या निकालाने चंद्रकांतदादांना सणसणीत चपराक -

खासदार संजय पाटील विधान परिषदेचे आमदार होते, तेव्हा निधी आला. काम वेळेत झालं नाही म्हणून परत गेला. परत तरुणाईंने पुढाकार घेऊन, ग्रामपंचायतीमार्फत निधी मंजुर केला. तालमीसाठी पोरांनी स्वतः वाळू ओढली. आलेला निधी संपला म्हणून जाहिर झालं. संजय पाटील नंतर खासदार झाले. पुन्हा निधी उभारला. हे सगळं साकारताना जुने पैलवान आणि तरुणांनी खूप कष्ट घेतले. तालीम तर झाली. माती कोणी टाकायची गाव प्रशासनाने निधी अभावी हात वर केले. तरुण आणि पैलवानांनी पुन्हा वर्गणी गोळा केली. माती आणली. 

मातीच्या व्यवस्था व मळणीसाठी तेल, हळद, लिंबू, दही, दूधासाठी खर्च होणार होता. पुन्हा पैशाच्या प्रश्न आला. विषय लांबत लांबत यंदाच्या दिवाळीपर्यंत आला. दिवाळीसाठी गावात आलेले ज्येष्ठ, सरकारी नोकरदार, मुंबईकर, गलाई बांधव, नोकरदारांनी भरभरून मदत केली. दिवाळी पाडव्याला अखेर गावात शड्डू घुमला. 

हेही वाचा -  चंद्रकांत दादांचा एक चेहरा दुसऱ्याला मदत केल्याचा, तर दुसरा काटा काढण्याचा -

 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wrestling start after 15 years in sangli participate by youngsters