सांगलीतील काळम्मादेवी, भैरवनाथ मंदिरातील यात्रा यंदा रद्द

विजय लोहार
Friday, 23 October 2020

कार्यक्रम यंदा होणार नाही असे कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितले.

सांगली : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या काळमवाडीतील काळम्मादेवी आणि नेर्ले येथील भैरवनाथ मंदिरातील अनेक वर्षांपासून चालत आलेला इंगळा वरून चालण्याचा कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. शनिवार (२४) तारखेचा हा कार्यक्रम यंदा होणार नाही असे कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितले. ते पत्रकारांशी आज बोलत होते. 

हेही वाचा - सायंकाळ होताच काड काडच्या आवाजने भरते धडकी -

कोरोनामुळे अनेक वर्षांची नेर्ले व काळमवाडी येथील इंगळावरून चालण्याची परंपरा खंडित झाली आहे. काळमवाडी येथे पुरातन काळातील काळम्मादेवीचे स्वयंभु अधिष्ठान आहे. परदेशासह महाराष्ट्र, कर्नाटकातून भाविक दरवर्षी काळम्मादेवीच्या दर्शनासाठी येतात. दसऱ्याच्या निमित्ताने परंपरे नुसार काळम्मादेवीच्या मंदिरासमोर भर दुपारी बारा वाजता लाकडे पेटवून इंगळ पाडले जातात. तलावात अंघोळ करून इंगळावरून चालतात. यावेळी 'काळूबाईच्या नावानं चांगभलं' असा जयघोष परिसरात असतो. कोरोनामुळे भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या काळमवाडीचे शनिवारी होणारे दसऱ्याचे इंगळ होणार नाही. त्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन वाघ यांनी केले आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, कर्नाटक आदी भागातून अनेक भाविक इंगळवरून चालण्यासाठी येतात. नेर्लेतील भैरवनाथ व जोगेश्वरीचे मंदिर हे देखील पुरातन काळातले आहे. पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, कराड, कर्नाटक मधील हुबळी, चिक्कोडी, बेळगाव, आदी भागातून भाविक येतात. माने गल्ली येथील भैरवनाथाच्या विहिरीमध्ये भाविक आंघोळ करून "भैरुबाच्या नावानं चांगभलं !" म्हणत लालबुंद झालेल्या विस्तवावर चालतात. यावेळी गाभाऱ्यात असलेल्या भैरवनाथाच्या मूर्तीला घाम फुटतो, असे पुजारी सांगतात. काळमवाडी व नेर्ले परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

हेही वाचा -  हृदयद्रावक ; अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या एकाच कुटुंबावर काळाचा घाला, तीन ठार तर चार जखमी -

नवरात्रोत्सवात महिलांचा सहभागहीअसतो. काळमवाडी व नेर्ले परिसरातील महिला देखील इंगळवरून चालतात. इंगळ वरून चालल्या शिवाय उपवास सोडला जात नाही असे मानले जाते. मात्र ही दोन्ही मंदिरे आता बंद आहेत. त्यामुळे शनिवारी होणारे इंगळ रद्द केले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this year the festival of sangli district and event canceled due to precautions of corona in sangli