यंदा दोन कंटेनरच डाळिंब युरोपियन राष्ट्रांना निर्यात ?

नागेश गायकवाड
Friday, 25 December 2020

युरोपियन राष्ट्रांना रेसिड्यू फ्री (कीटकनाशक विरहित) डाळिंबाची दरवर्षी अडीचशे कंटेनर देशातून आणि आटपाडी तालुक्‍यातून शंभर कंटेनर निर्यात होत होती. यंदा अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसल्याने निर्यातीचा टक्का खाली कोसळला आहे.

आटपाडी : युरोपियन राष्ट्रांना रेसिड्यू फ्री (कीटकनाशक विरहित) डाळिंबाची दरवर्षी अडीचशे कंटेनर देशातून आणि आटपाडी तालुक्‍यातून शंभर कंटेनर निर्यात होत होती. यंदा अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसल्याने निर्यातीचा टक्का खाली कोसळला आहे. यंदा देशातून दहा, तर आटपाडीतून जेमतेम दोन कंटेनरची कशीबशी निर्यात होईल, असे चित्र आहे. 

देशात गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात डाळिंब फळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. यात महाराष्ट्रातील रेसिड्यू फ्री डाळिंबाची युरोपियन राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आखाती देश, दुबई, बांगलादेश या देशांनाही हे डाळिंब पाठविले जातात. युरोपियन राष्ट्रांतून 200 ते 250 कंटेनरची दरवर्षी मागणी असते. एक कंटेनर 16 टनांचा असतो. साडेतीनशे ते चारशे टन रेसिड्यू फ्री डाळिंबाची निर्यात युरोपियन राष्ट्रांना होते. या डाळिंबांना उच्चांकी भाव मिळतो. त्याखालोखाल आखाती देश, दुबई आणि बांगलादेशाला निर्यात होणाऱ्या डाळिंबाला भाव मिळतो. रेसिड्यू फ्री डाळिंब निर्मितीचे तंत्र शेतकऱ्यांनी अवगत केले आहे. त्यामुळे युरोपियन राष्ट्रांची मागणी पूर्ण होत होती. 

यंदा अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला. सतत पाच महिने पाऊस कोसळत राहिला. त्यामुळे डाळिंबाचे प्रचंड मोठे नुकसान झाले. डाळिंब वाचविण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान होते. तसेच, स्थानिक बाजारपेठेत भावही मोठे होते. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी रेसिड्यू फ्रीचा नाद सोडून बागा वाचविण्याला प्राधान्य दिले. परिणामी, यावर्षी युरोपियन राष्ट्रांना डाळिंबाची निर्यात पूर्ण बंद पडली आहे. 

दरवर्षी नोव्हेंबरपासून निर्यात सुरू होते. ती उशिरा झाली. आतापर्यंत देशातून 16 टनांचे सात; तर आटपाडी तालुक्‍यातून एकाच कंटेनरची निर्यात झाली आहे. हंगामात देशातून एकूण दहा, तर तालुक्‍यातून दोन कंटेनर डाळिंबाची निर्यात होण्याची शक्‍यता आहे. यंदा पहिल्यांदाच डाळिंबाची निर्यात जवळपास पूर्ण ठप्प पडली आहे. 

स्थानिक बाजारपेठेतच भाव 
गेल्या वर्षी रेसिड्यू फ्री डाळिंबाचे भाव प्रतिकिलो 80 ते 120 दरम्यान होते; तर स्थानिक बाजारपेठेत 50 ते 80 रुपये भाव होता. यंदा मात्र हा भाव 225 रुपये आणि 150 रुपये सुरू आहे. स्थानिक दर असल्याने शेतकऱ्यांनी रेसिड्यू फ्रीचा नाद सोडून डाळिंब वाचविण्याला प्राधान्य दिले. 

गेल्या वर्षी आटपाडी तालुक्‍यातून 100 कंटेनरची युरोपियन राष्ट्रांना निर्यात झाली होती. यंदा एकच कंटेनर आतापर्यंत गेला असून, अजून कसातरी एक कंटेनर जाईल. युरोपियन राष्ट्रांची निर्यात खूप खाली आली आहे. 
- विजय मरगळे, रेसिड्यू फ्री डाळिंब निर्मित सल्लागार 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year, only two containers of pomegranates were exported to European countries