Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील हिंदूंची जाती-जातीत विभागणी करून त्यांची आपसात भांडणे लावली जातील.
Yogi Adityanath
Yogi AdityanathSAkal

सांगली : काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील हिंदूंची जाती-जातीत विभागणी करून त्यांची आपसात भांडणे लावली जातील. हिंदूंमध्ये फूट पाडून गुपचूप ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाचा लाभ मुस्लिमांना द्यायचा आहे, असा दावा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केला.

भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आज सांगलीत चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश खाडे, मंत्री गुलाबराव पाटील, उमेदवार आणि खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सांगलीत प्रथमच सभा झाली या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या सभेत योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली.

ते म्हणाले, " काँग्रेस जाहीरनाम्यात अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीनुसार आहार घेण्याचे स्वातंत्र्य देणार आहे. पण, मुस्लिमांना असे काय वेगळं खाण्याची इच्छा आहे, जी काँग्रेस पूर्ण करीत आहे, तर त्यांना गोमांस खाण्याची परवानगी याद्वारे दिली जाणार आहे. गोहत्या करण्याचे पाप काँग्रेस करणार आहे," असा आरोपही त्यांनी केला.

योगी म्हणाले, " या निवडणुकीत काँग्रेस शक्य तेवढे खोटे बोलत आहे. कारण काँग्रेस लवकरच इतिहासजमा होणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये हे निवडणूक लढण्याचे सुद्धा धाडस करीत नाहीत. आता अंतिम उपाय म्हणून जातीय जनगणनेच्या नावाखाली तुमची दिशाभूल करून हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत.

योगी आदित्यनाथ म्हणाले, महाराष्ट्राची भूमी वीरांची भूमी आहे. अटकपासून कटकपर्यंत स्वराज्य निर्माण करणाऱ्यांची ही भूमी आहे. सांगली शौर्य, पराक्रम, शेती, कला संस्कृती यांची आहे. भारताची परंपरेत सांगलीचे मोठे योगदान आहे.

महाराष्ट्राने देशाला खूप काही दिलं आहे. प्रत्येकाच्या मनात स्वराज्याची भावना निर्माण करण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले, लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज, पेशवा बाजीराव, वीर सावरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या भूमीतील महान व्यक्तींचे देशाच्या उभारणीत योगदान आहे.

ते म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही बदलता भारत बघितला आहे, २०१४ पूर्वीचा भारत आणि त्यानंतरचा भारत यात आपल्याला फरक दिसतो, जगात सन्मान मिळत नव्हता, दहशतवाद, नक्षलवादाने देशात दहशत होती.

शेतकरी आत्महत्या करत होते. ज्यांच्याकडे भ्रष्टाचार थांबवण्याची जबाबदारी होती तेच भ्रष्टाचारी होते. आता २०१४ नंतर मात्र मोदींच्या नेतूत्वाखाली जगात देशाचा सन्मान वाढला आहे. नक्षलवाद, दहशतवाद संपला आहे. देशाच्या सीमा सुरक्षित आहेत.

आत्मसन्मान, सुरक्षा, विकास आणि गरीब कल्याण ही मोदींची गॅरंटी आहे. तसेच आत्मनिर्भर, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा विजयी करायचे आहे. त्यासाठी संजय पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

संजयकाका पाटील म्हणाले, सन २०१४ साली मला संधी मिळताच जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील सिंचन योजना पूर्ण करण्याची संधी मिळाली. पाच राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे दुहेरीकरण केले. विरोधक दुष्काळात माणसे होरपळत असताना कुठे होते.

जनतेच्या पाण्यासाठी त्यांनी कधीच तोंड उघडले नाही. मात्र आता आमच्यावर टीका करत आहेत. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगात महासत्ता होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com