विट्यात मोटार उलटून तरूण जागीच ठार...एकुलता मुलगा गेल्याने आईवर दु:खाचा डोंगर...चौघे जखमी 

ACCIDENT.jpg
ACCIDENT.jpg

विटा (सांगली) - भरधाव वेगाने तासगावकडे जाणारी मोटार उलटून झालेल्या भीषण अपघातात अजय कालिदास गुरव (वय-26, रा. पारे) हा जागीच ठार झाला. विटा- तासगाव रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयाच्या पुढील वळणावर हा अपघात झाला. मोटारीतील अन्य चौघेजण जखमी झाले. यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी, पारे येथील पाच युवक मोटारीने विटा येथून तासगावच्या दिशेने भरधाव वेगाने निघाले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पुढील बाजूस असलेल्या मारुती सुझुकी शोरूम जवळील वळणावर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे मोटार दोनशे फुटापर्यंत अनेक पलटी खात बाजूला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश चक्काचूर झाला. यामध्ये पाठीमागे बसलेल्या अजय गुरव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर अजित बबन माने आणि अजय जोतिराम लवळे (रा. पारे) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. 

अपघातामध्ये मोटारीतील एअर बॅग उघडल्यामुळे चालक अमर संपत कदम आणि शेजारी बसलेले पवन संजय साळुंखे हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी रात्री अकराच्या सुमारास सर्व जखमींना विट्यातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत अजय गुरव याचा मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अपघातामध्ये मोटारीचा पूर्ण चुराडा झाला आहे. तर मोटार पलटी घात गेल्यामुळे आतील साहित्य दोनशे फूट अंतरापर्यंत फेकले गेले होते. तर आतमध्ये मृत व जखमींचे रक्त सांडल्याचे व काचांचा चुराडा झाल्याचे विदारक चित्र होते. 

मृत अजय गुरव हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून त्याच्या वडीलांचे त्याच्या लहानपणीच निधन झाले होते. आई आणि तो असे दोघेच घरात होते. त्याच्या निधनामुळे आईचा एकमेव आधार हिरावला गेला असून तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमी मधील पवन साळुंखे हे पारे गावचे माजी सरपंच आहेत. 

धोक्‍याच्या वळणावर अपघात - 
तासगाव रस्त्यावरील हे वळण अतिशय धोकादायक होते. गेल्या काही वर्षातच हे वळण मोठे केल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी छोटे वळण असताना या ठिकाणी अनेक अपघात झाले होते. वळणाच्या ठिकाणी रस्ता रूंद केल्यानंतर हा पहिलाच मोठा अपघात असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. 

संपादन : घनशाम नवाथे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com