esakal | आजचा बड्डेबॉय उद्याचा डॉन! 
sakal

बोलून बातमी शोधा

crime1.jpg

घमंड न करना जिंदगीमे... मौका सभीको मिलता है, जंगल वही होता है... लेकीन टायगर बदल जाता है...अशा आशयाचे फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर स्टेट्‌स ठेवून चौकाचौकांत साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाच्या "फॅड'मुळे रोज एका नवा भाई तयार होतो आहे. तलवारीने केक कापणे आता सर्रास झाले आहे. याच वाढदिवसाच्या "फॅड'मधून तयार होणारा आजचा बड्डेबॉय उद्याचा डॉन म्हणून मिरवताना दिसतो. अवघ्या विशीतल्या पोरांनी यायचे, शहरात टग्या म्हणून मिरवणाऱ्याला पिस्तुलातून गोळ्या झाडायच्या आणि मग त्याच्या जागेवर डॉनगिरी करायची, असाच "कऱ्हाड पॅटर्न' आता गुन्हेगारीत रूजू लागला आहे.

आजचा बड्डेबॉय उद्याचा डॉन! 

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड ः घमंड न करना जिंदगीमे... मौका सभीको मिलता है, जंगल वही होता है... लेकीन टायगर बदल जाता है...अशा आशयाचे फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर स्टेट्‌स ठेवून चौकाचौकांत साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाच्या "फॅड'मुळे रोज एका नवा भाई तयार होतो आहे. तलवारीने केक कापणे आता सर्रास झाले आहे. याच वाढदिवसाच्या "फॅड'मधून तयार होणारा आजचा बड्डेबॉय उद्याचा डॉन म्हणून मिरवताना दिसतो. अवघ्या विशीतल्या पोरांनी यायचे, शहरात टग्या म्हणून मिरवणाऱ्याला पिस्तुलातून गोळ्या झाडायच्या आणि मग त्याच्या जागेवर डॉनगिरी करायची, असाच "कऱ्हाड पॅटर्न' आता गुन्हेगारीत रूजू लागला आहे. 

महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा सल्या चेप्याने खून केला. त्यानंतर तो डॉन झाला. सल्याचा गेम करून डॉन होणाऱ्यांसह प्रत्येकाचा त्यानंतरचा प्रवास पाहिला तर नवख्याने जुन्या डॉनला मारून त्याची जागा घेतल्याचे दिसते. हे तर एखाद्या सिनेमातही नाही घडणार. मात्र, कऱ्हाडकर त्याची अनुभूती घेत आहेत. पोलिसांच्या लेखी मात्र सारे काही आलबेल आहे. शहरातील चौकाचौकांत वाढदिवस साजरे केले जातात. त्याची पद्धत फारच भन्नाट आहे. चौकात दुचाकी आडवी लावायची किंवा मोठ्या चारचाकी वाहनाच्या बॉनेटवर केक ठेवायचा. तो कापण्यासाठी तलवार, मोठ्या आकाराच्या सत्तूरसारखा चाकू आणायचा. चौकात सायंकाळी सात ते नऊला घडणारे वाढदिवस लोक उघड्या डोळ्यांनी पाहतात. कोणी त्यांना हटकत नाही. हटकलेच कोणी तर अंगात डॉनगिरी असलेला "बड्डेबॉय'च उर्मट उत्तर देतो. चारचाकीत असलेली ध्वनियंत्रणा जोरात लावली जाते. काही बड्डेबॉय तर शेकड्यात पोस्टर करून लावतात आणि हजारभर लोकांना जेवण घालून रात्रभर फटाकेबाजी करताना दिसतात. डॉनच्या वाढदिवसाच्या व्यासपीठावर अधिकारी, पोलिस प्रमुख पाहुणे म्हणून मिरवताना दिसतात. अशा सगळ्याच गोष्टीला लगाम बसत नाही, तोपर्यंत कऱ्हाडच्या गुंडगिरीचे समूळ उच्चाटन अशक्‍य आहे. वास्तविक बड्डे ते पोस्टरबॉयपर्यंतचा या युवकांचा प्रवास त्यांच्या भविष्यातील गुंडगिरीला आणि डॉनगिरीला घातलेले खतपाणीच ठरत आहे. त्या सगळ्या गोष्टीला पोलिसांनी योग्य वेळी रोखण्याची गरज आहे. मात्र, येथे सारे उलटेच दिसते. पोलिसांना बड्डेबॉयना रोखता येत नाही. रोखणे राहिले बाजूलाच उलट पोलिसच त्या बड्डेबॉयच्या धिंगाण्यात व्यासपीठावर असतात. अनेकदा त्या बड्डे पार्टीत नंग्या तलवारी नाचविल्या जातात. काहीवेळा पिस्तूल काढून हातात घेऊन नाचकाम केले जाते. मात्र, त्या हालचाली पोलिसांपर्यंत पोचत नाहीत. कारण अशी काही खबर पोचलीच तरी त्यावर कारवाई होत नाही. पवन सोळवंडेवर हल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांकडे मध्यंतरी पिस्तूल सापडले. मात्र, त्यावर कारवाई काहीच झाली नाही, झाली ती तडजोडच. लाखात आकडा मिळाल्यावर अधिकाऱ्यांनीही जाऊ दे, म्हणून सोडून दिले. त्याचाच परिणामाचा एक भाग म्हणजे सोळवंडेवर झालेल्या गोळीबाराकडे बघावे लागेल. त्यामुळे अशा गोष्टींवर पोलिसांना नियंत्रण ठेवताना सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह व्हावे लागेल. पारंपरिक पद्धत सोडून काम करावे लागेल. अन्यथा कऱ्हाडच्या गुंडगिरीचा पॅटर्न पुन्हा एकदा उफाळून येऊ शकतो. 

गर्दीत उभे राहून माज करणे कोणालाही जमते; पण खरी हिम्मत तर त्यांच्यात असते, जो गर्दीच्या विरोधात उभा राहतो... अन्‌ तेही वजनात..., उडवायचा तर डायरेक्‍ट टॉपच्याला... उगाच झाडाच्या फांद्या तोडायच्या नाहीत... साला जिंदगी थोडीच जगायची... पण कशी तीही रूबाबात, क्वॉलिटी तीच, रूबाब पण तोच... अशा आशयाच्या अनेक पोस्ट फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर दोन वर्षांपासून फिरत आहेत. त्या सगळ्या पोस्ट खून प्रकरणातील संशयित शिवराज इंगवले, जुनेद शेख यांच्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुकवर शेअर केल्या आहेत. त्यानंतर त्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही टोळी एक उदाहरण आहे.

सल्या चेप्या सोबतच्याही अनेकांच्या पोस्ट मैं हू डॉन नावाने फिरताहेत. सल्याच्या मृत्यूनंतर शेर कभी मरता नही... उसकी दहाड हमेशा कानोमे गुंजती रहेगी... अशा आशयाच्या पोस्ट शेअर केल्या जात होत्या. आजही त्या फिरत आहेतच. किती दाहकता दाखवणाऱ्या पोस्ट सहजपणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचा वाचक विशीतील कॉलजेचा तरुणच आहे. हातात पिस्तूल, कोणावर तरी नेम धरलाय आणि थेट निशाणाच लावल्यासारखे फोटोही फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर गुंडांच्या टोळ्यांकडून शेअर होत आहेत. मात्र, याबाबतची सुतारामही कल्पना किंवा माहिती कऱ्हाडच्या पोलिसांना नाही. आजही ते अनभिज्ञनच आहेत. पोलिस अजूनही बाबा आदमच्याच जमान्यात आहेत. गुंडांच्या टोळ्या मात्र ऍटोमॅटिक पिस्तुलासह सोशल मीडियावार व्हायरल आहेत. एकाही पोलिसाला गुंडांच्या हालचाली माहिती नव्हत्या.

पवन सोळवंडेवर गोळीबार झाल्यानंतर त्या पोस्ट पोलिस आता शोधू लागले आहेत. काय होत्या त्या पोस्ट, याची छाननी सुरू आहे. बैल गेला अन्‌ झोपा केल्यासारखाच हा प्रकार आहे. जुनेदच्या टोळीचा दोन वर्षांपासून पवन सोळवंडेच्या टोळीशी वाद होता, असे सांगणाऱ्या पोलिसांनी त्या टोळ्यांचा "करंट अंडरकरंट' यापूर्वीच का नाही कळाला, अशा सामान्यांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर पोलिस दलाकडे नाही. सल्या चेप्यावरही बेछुट गोळीबार झाला. त्याच्यावर हल्ला करणारा एकही संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवर नव्हता. मात्र, ते सारे संशयित नक्कीच बड्डेबॉईज होते. पोस्टरबाजीत रस दाखवून 20 फुटांपासून 50 फुटांचे फ्लेक्‍स लावण्याच्या संस्कृतीलाही त्याच लोकांनी कऱ्हाडमध्ये जन्म दिला. जेवढा मोठा फ्लेक्‍स, तेवढा मोठा तो डॉन, अशी संस्कृती येथे रूजवून पश्‍चिम महाराष्ट्रात "कऱ्हाड पॅटर्न' नव्याने रूजविणाऱ्या गुंडांच्या टोळ्या पोलिसांच्या आवाक्‍यात येणार तरी कधी, हाच खरा प्रश्न आहे.

पोलिस प्रत्यक्ष कोणताही असो, अंग झटकून काम करत नाही तोपर्यंत त्यांना यश येणार नाही. तडजोडी करण्यापेक्षा शहराच्या भल्याचा विचार त्यांनी करण्याची गरज आहे. पवन सोळवंडेवर हल्ला करण्यासाठी आलेल्या प्रत्येकाकडे एक पिस्तूल होते, अशी चर्चा आहे. मात्र, पोलिस केवळ दोनच पिस्तूल जप्त दाखवतील, त्यातही ते पिस्तूल गावठी असतील, असा अंदाज लावून नागरिक चर्चा करत आहेत. पोलिसांची समाजातील ही प्रतिमा बदलली पाहिजे. यासाठी पोलिस दलाने योग्य पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल. 


वस्तुस्थितीवर एक नजर... 
- फेसबुक, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गुंडगिरीच्या स्टेट्‌सकडे पोलिसांचे दुर्लक्ष 
- पोलिस बाबा आदमच्या तर गुंडगिरी पोचली पिस्तुलाच्या जमान्यात 
- जेवढा मोठा फ्लेक्‍स, तेवढा मोठा डॉनची कऱ्हाड पॅटर्नची रूजतेय संस्कृती 
-  बड्डेबॉईज होताहेत आगतिक, पोलिसांच्या लेखी मात्र सारेच आलबेल 
- पोलिसांचाही बड्डेबॉईजच्या धिंगाण्यात व्यासपीठावर वावर

loading image
go to top