संचालक ओळखीचे आहेत, अनेकांना नोकरी लावलीय!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

हलहळ्ळी (ता. अक्कलकोट) येथील तरुणाला महाराष्ट्र राज्य वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावतो असे सांगून त्याची पावणेआठ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

सोलापूर : मुंबईतील वैद्यकीय शिक्षण व संशोधक संचालक हे ओळखीचे आहेत. या अगोदर खूप मुलांना नोकरी लावून दिली आहे असे सांगून नोकरीचे आमिष दाखविले. हलहळ्ळी (ता. अक्कलकोट) येथील तरुणाला महाराष्ट्र राज्य वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावतो असे सांगून त्याची पावणेआठ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा - अन्‌ वकिलाने वाढदिवसाला घेतलेली सायकल काढली बाहेर! 

अगोदर खूप मुलांना नोकरी लावली आहे
वीरपक्ष घेरडे (रा. कर्णिकनगर, सोलापूर), संतोष सिद्राम माने (रा. अमोल कॉम्प्लेक्‍स, जुळे सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. अनिल सिद्रामय्या स्वामी (वय 28) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 27 मार्च 2018 रोजी कर्णिकनगर येथे घडली आहे. अनिल स्वामी याचे 2012 मध्ये बीए शिक्षण पूर्ण झाले होते. तो नोकरीच्या शोधत होता. चुलत्याने सांगितल्यानंतर अनिल याने वीरपक्ष याची भेट घेतली. नोकरीच्या अनुषंगाने कागदपत्रे दाखविली. वीरपक्ष याने ओळखीचा असलेला संतोष माने हा वैशंपायन स्मृती महाविद्यालय येथे लिपिक पदावर नोकरीला आहे. तो नोकरीला लावण्याचे काम करत असल्याचे सांगितले. संतोष माने याने अगोदर खूप मुलांना नोकरी लावली आहे. आरोपींनी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक या पदासाठी मे 2018 पर्यंत नोकरी लावून देतो, असे सांगून आठ लाख रुपयांची मागणी केली. 

हेही वाचा - का राहणार उद्या देशव्यापी बंद?

आरोपींनी दिली उडवाउडवीची उत्तरे
वीरपक्ष याने मध्यस्थी करून नोकरीसाठी सात लाख 51 हजार रुपये देण्याचे ठरले. अनिल याने पैशांची जमवाजमव केली. चपळगावच्या बॅंक ऑफ इंडिया शाखेत पैसे भरले. त्याचा धनादेश आरोपींकडे दिला. 27 मार्च 2018 रोजी आरोपी संतोष माने याच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा सिव्हिल हॉस्पिटल येथील खात्यावर पैसे जमा झाले. त्यानंतर प्रत्यक्ष भेटून अनेकदा नोकरीबाबत विचारणा केली. आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मागे लागल्यानंतर आरोपींनी पैसे परत देतो, म्हणून धनादेश दिला. तो धनादेश वटला नाही. अनिल यांनी वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी जाऊन चौकशी केली. त्या ठिकाणी संतोष भेटला नाही. घरी जाऊन चौकशी केली. घरच्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मोबाईलवर संपर्क साधला मात्र मोबाईल क्रमांक बंद असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth fraud at solapur