सोनवडेतील बलात्कारप्रकरणी युवकास जन्मठेप

Youth sentenced to life imprisonment for rape At Sonavade- Sangali
Youth sentenced to life imprisonment for rape At Sonavade- Sangali
Updated on

इस्लामपूर (जि. सांगली) ः सोनवडे येथील महिलेवर बलात्कार करणाऱ्या अरुण ऊर्फ बाबू सुनील जमदाडे (वय 20, रा. सोनवडे, ता. शिराळा) याला न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 


ही घटना 9 फेब्रुवारी 2020 ला सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आरळा ते नाठवडे या रस्त्यावर घडली होती. आरोपी जमदाडे याने संबंधित महिलेस निर्जन ठिकाणी रस्त्यात अडवून तू मला आवडतेस असे म्हणून तिच्या अंगाशी झोंबा-झोंबी केली. महिलेने त्यास प्रतिकार करून ढकलून दिले. परंतु जमदाडे याने रागाने पुन्हा तिच्या डाव्या बरगडीवर हाताने जोरात दोन ते तीन वेळा मारहाण करून गंभीर दुखापत केली व लगतच्या कॅनॉलमध्ये ढकलून दिले.

कॅनॉलमधून वर आल्यावर तिला पुन्हा ढकलून जमिनीवर पाडून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणास सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देवून तो निघून गेला होता. या बाबतची फिर्याद संबंधित महिलेने कोकरूड पोलिस ठाण्यात दिली होती. कोकरूड पोलिसांनी जमदाडे याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करत येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. त्याची सुनावणी आज होऊन आरोपी जमदाडे याला शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले.

फिर्यादी महिला, पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. सलमा जमादार, डॉ. देसाई व तपासी अंमलदार दत्तात्रय कदम यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील रणजित पाटील यांनी युक्तिवाद केला. आरोपी जमदाडे याला कलम 376 (1) एम. नुसार जन्मठेप, कलम 506 नुसार 7 वर्षे सश्रम कारावास, कलम 325 नुसार 3 वर्षे सश्रम कारावास, कलम 341 नुसार 1 महिना सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 6 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com