मुंबईत तुटली युती, इथं बिघडली आघाडी

निवास चौगले - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढेल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने जिल्ह्यात शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या संभाव्य आघाड्यांत स्थापन करण्यापूर्वीच बिघाडी झाली आहे. या निर्णयाने शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील-सरूडकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्यासह सेनेशी युती करू पाहणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड आदींचीही चांगलीच पंचाईत झाली आहे.

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढेल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने जिल्ह्यात शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या संभाव्य आघाड्यांत स्थापन करण्यापूर्वीच बिघाडी झाली आहे. या निर्णयाने शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील-सरूडकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्यासह सेनेशी युती करू पाहणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड आदींचीही चांगलीच पंचाईत झाली आहे.

गुरुवारी (ता. 26) प्रजासत्ताकदिनी मुंबईत शिवसैनिकांच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढेल, कोणाशीही युती करणार नाही, अशी घोषणा केली. एवढेच नव्हे, तर स्थानिक पातळीवर कोणी दुसऱ्याशी हातमिळवणी केली तर ती पक्षाशी, भगव्याशी गद्दारी असेल, अशांची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा दिला आहे. श्री. ठाकरे यांच्या या भूमिकेने जिल्ह्यातील काही तालुक्‍यांतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. परिणामी बहुतांश तालुक्‍यांत दोन्ही कॉंग्रेस किंवा आघाडी, भाजप आघाडी व शिवसेना असे तिरंगी लढतीचे चित्र पाहायला मिळणार आहे.

हातकणंगले तालुक्‍यात कॉंग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न होता. त्यातून त्यांनी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी बोलणी सुरू केली. तशी एक बैठकही झाली. या बैठकीला सेना आमदार डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते. श्री. ठाकरे यांच्या इशाऱ्याने ही आघाडी आता होणे अशक्‍य आहे.

"जनसुराज्य'ला रोखण्यासाठी शाहूवाडीत सेना आमदार सत्यजित पाटील यांनी राष्ट्रवादीशी संधान साधले. जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला; पण आता या निर्णयापासूनही पाटील यांना मागे यावे लागेल. कागलात भाजपपेक्षा प्रा. संजय मंडलिक यांची राष्ट्रवादीबरोबरच युती होईल, असे चित्र होते आणि आजही आहे. पण आता श्री. मंडलिक यांनाही स्वतःची तालुक्‍यातील ताकद दाखवावी लागणार आहे. त्यांच्या जोडीला माजी आमदार संजय घाटगे असतील. शिरोळमध्ये आमदार उल्हास पाटील यांनीही समविचारी पक्षांना सोबत घेऊन एकत्र येण्याचा विचार सुरू केला होता. अशीच स्थिती भुदरगड-राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांची होती; पण आता या दोघांना स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवावे लागतील.

संख्याबळ वाढवण्याची गरज
2014 च्या विधानसभेत जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार विजयी झाले. शहरातील एक आमदार वगळता उर्वरित पाच आमदारांचा थेट संबंध या निवडणुकीशी आहे. जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहात सेनेचे आठ सदस्य आहेत. यापैकी पाच सदस्य एकट्या करवीर तालुक्‍यातील आहेत. करवीरचे सेना आमदार चंद्रदीप नरके यांनी अजून तरी कोणाशी आघाडीचे संकेत दिलेले नाहीत. उर्वरित तीनपैकी दोन सदस्य पन्हाळा तालुक्‍यातून तर एक हातकणंगले तालुक्‍यातील आहे. येणाऱ्या निवडणुकीत पाच आमदार सेनेचे असतील तर त्या प्रमाणात हे संख्याबळ वाढवण्याची जबाबदारी या आमदारांवर पडली आहे.

उघड नाही; पण छुपी युती शक्‍य
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणाशीही युती करायची नाही, असे जाहीर केले असले तरी सेनेच्या पाचही आमदारांसमोर आता धर्मसंकट आहे. विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेससह इतर पक्षातील लोकांनी त्यांना मदत केली आहे. हा पैरा फेडायचे म्हटल्यास आघाडी हा पर्याय होता. पण त्यावर पक्षप्रमुखांनी बंदी घातल्याने निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात एकमेकांच्या मदतीची परतफेड केली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Web Title: Zilla Parishad, Panchayat Samiti elections, the Shiv Sena will fight on its own