दोन्ही राजांत रंगणार काट्याची लढत

- उमेश बांबरे
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

खुल्या गट, गणांत चुरस; राखीव जागांवर उमेदवार मिळवताना होणार दमछाक
सातारा - फिस्कटलेल्या मनोमिलनानंतर होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सातारा तालुक्‍यातील दहा गट आणि २० गणांवर वर्चस्व राखण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे व बाळासाहेब पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजधानी जिल्हा विकास आघाडीचे स्वतंत्र उमेदवार ‘राष्ट्रवादी’ला अडचणीचे ठरणार आहेत. पंचायत समितीबरोबरच जिल्हा परिषदेचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही राजांत काट्याची लढत यावेळेस पाहायला मिळणार आहे.

सातारा तालुक्‍यात आजपर्यंत दोन राजांच्या मनोमिलनाची सत्ता राहिली; पण यावेळेस गट, गणांची वाढलेली संख्या आणि फिस्कटलेले मनोमिलन यामुळे दोन्ही राजांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात असतील. त्यातच उदयनराजेंनी राष्ट्रवादीत असूनही या निवडणुकीसाठी राजधानी जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीसाठी शुड्डू ठोकला आहेत. याचा सर्वाधिक परिणाम सातारा तालुक्‍यात पाहायला मिळणार आहे. गेल्या वेळेस उदयनराजेंचे चार गटात सदस्य होते. या वेळी दहा गट असल्याने जास्तीतजास्त गटावर आपले वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही राजांकडून प्रयत्न होणार आहेत. यावेळेस वर्णे, शेंद्रे हे दोन गट खुले असून, येथे दोन्ही राजांच्या कार्यकर्त्यांत चुरस होणार आहे, तसेच पाटखळ, लिंब, शाहूपुरी, गोडोली, कोडोली, कारी, अपशिंगे हे सात गण खुले आहेत. दोन गट आणि सात गणांत चुरशीच्या लढती होतील. अनेक ठिकाणी तिरंगी ते चौरंगी लढती होतील. 

कऱ्हाड उत्तरमधील वर्णे, नागठाणे या गटांत तिरंगी लढती होतील. त्यामध्ये दोन्ही राजेंच्या विरोधात भाजपही असेल. यावेळेस इच्छुकांची संख्या अधिक असेल. त्यामुळे कोणाला अधिकृत उमेदवारी द्यायची ही दोन्ही राजांपुढे डोकेदुखी राहील, तर नाराजांना भाजप, काँग्रेस हा पर्याय असणार आहे. 

जे गट आरक्षित आहेत, तेथे इच्छुक पुढे येण्यास तयार नाहीत. तेथे तुल्यबळ उमेदवार शोधण्याची कसरत करावी लागणार आहे. त्यामध्ये लिंब, पाटखळ, वनवासवाडी, नागठाणे या गटांत अजूनही फारशी दावेदारांची नावे पुढे आलेली नाहीत. पंचायत समिती गणांत शिवथर, खेड, तासगाव, संभाजीनगर, शेंद्रे, दरेखुर्द, नागठाणे येथे राखीव जागा असल्याने उमेदवार मिळण्याची वानवा आहे. मनोमिलन तुटल्याने उमेदवारीची दावेदारी फारच कमी आहे. त्यामुळे दोन्ही राजे आपापले उमेदवार ठरवतील. त्यांना राजमान्यता मिळेलच असे नाही. एकूणच यावेळी वाढलेल्या गण, गटांत दोन्ही राजेंमध्ये लढत रंगणार आहे. 

भाजपचा चंचूप्रवेश शक्‍य 
यावेळेस सातारा तालुक्‍यात दोन्ही राजे एकमेकांविरोधात असल्याने भाजपचा चंचूप्रवेश शक्‍य आहे. गेल्या निवडणुकीत मंगल घोरपडे या दोन्ही राजांच्या विरोधात अपक्ष निवडून आल्या होत्या. त्या आता भाजपमध्ये आहेत. आता त्यांचे चिरंजीव वर्णे गटातून इच्छुक असून, ते यशस्वी झाल्यास सातारा तालुक्‍यातून भाजपचा शिरकाव होणार आहे. 

Web Title: zp election satara