esakal | गुडेवारांचा डोस कडू का वाटतोय?  कायदा मोठा की सोय?

बोलून बातमी शोधा

ZP Members trying for the replacement of Chandrakant Gudevar, additional chief executive officer

ल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीसाठी सदस्यांनी शड्डू ठोकला आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीवर सदस्यांचा आक्षेप आहे. गुडेवार कायदा पाळतात, नियमांचे कडक आणि टक्केवारीला दणका देऊन कामाच्या दर्जाबाबत प्रचंड आग्रही आहेत,

गुडेवारांचा डोस कडू का वाटतोय?  कायदा मोठा की सोय?
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीसाठी सदस्यांनी शड्डू ठोकला आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीवर सदस्यांचा आक्षेप आहे. गुडेवार कायदा पाळतात, नियमांचे कडक आणि टक्केवारीला दणका देऊन कामाच्या दर्जाबाबत प्रचंड आग्रही आहेत, असेच आतापर्यंतचे चित्र समोर आले आहे. कुठल्याही राजकीय पक्ष, सदस्य आणि त्यांच्या ठेकेदारांसाठी हे चांगले लक्षण नसते. त्यामुळे गुडेवारांचा डोस कडू वाटतोय, हे वास्तव आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी चालवायची की ठेकेदारांनी याचे उत्तर शोधण्याची हीच वेळ आहे. 

चंद्रकांत गुडेवार यांचे आजवरची कामाची पद्धत आक्रमक आणि कामाबाबत आग्रही राहिली आहे. "जॉब प्रोफाईल' कटाक्षाने पाळणारे म्हणून त्यांचा लौकिक आहे. ज्या गोष्टीसाठी अधिकारी, कर्मचारी पगार घेतात, ते काम त्यांनी केलेच पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे. त्यातून काहींना दणका बसला आहे. त्यांनी गेल्या महिनाभरात ठेकेदार धार्जिणी आणि सदस्यांचे नाहक महत्व वाढवणाऱ्या अटींचा जू मानेवरून फेकून दिला आहे.

कामाचे वाटप करताना ठेकेदारांच्या नावाची शिफारस करण्याचा सदस्यांचा अलिखित हक्क त्यांना डावलला आहे. प्रत्येक ठेकेदाराला काम मिळावे, ते दर्जेदार व्हावे, हा त्यांचा प्रयत्न आहे. सदस्यांचा स्वाभिमान इथेच दुखावला गेला. तेथून मग कुणी कुठल्या रंगचा शर्ट घातला आहे, यावरही चर्चा सुरु झाल्या आहेत. 

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा प्रशासकिय स्वभाव वेगळा आहे. ते पुरेपूर संधी देतात आणि तरीही सुधारणा झाली नाही तर कारवाई करतात. त्याची प्रसिद्धी न करता त्या निलंबित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांच्या स्वाभिमानाचाही ते विचार करतात. गुडेवार यांची पद्धत याच्या बरोबर उलटी आहे. नोकरी मिळाली हीच संधी, त्यानंतर चुका झाल्या की शिक्षा, हा त्यांचा खाक्‍या आहेत. "कुणाला निलंबित केले तर मला पाप लागत नाही', या त्यांच्या स्पष्ट भूमिकेने त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत. त्यामुळेच काही प्रकरणांच्या चौकशा गुडेवार यांच्याकडेच द्या, अशी जाहीर मागणीही होऊ लागली आहे. 

अशावेळी गुडेवार यांच्या पाठीशी राहून दर्जेदार कामे करून घेण्याची सदस्यांची जबाबदारी आहे. वर्षानुवर्षे टेबल उबवणाऱ्या, टक्केवारीला सोकलेल्या आणि तकलादू कामे करून बिले काढणाऱ्या व्यवस्थेला दणका देण्याची हीच संधी आहे. सदस्यांना ती का नको आहे? काही लोक या व्यवस्थेचे भागीदार आहेत का, अशी शंका यायला वाव आहे. 

झेडपी जागी होतेय 

जिल्हा परिषदेत गेल्या तीन वर्षात भाजपने चांगली सत्ता चालवली. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या काळात फारशा चुकीच्या गोष्टींची चर्चा झाली नाही. विरोधी बाकावरील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनेही ती केली नाही. सारेच मित्र... आता जिल्हा परिषद जागी झाली आहे. पाणी योजनांच्या घोटाळ्यापासून ते ठेकेदारांच्या काम वाटपापर्यंतचे विषय चर्चेला आले आहेत.